पिंपरी-चिंचवड | ३० सप्टेंबर २०२६ : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असताना पिंपरी-चिंचवडमधील छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे सचिन काळभोर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले असून त्याची प्रत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य आणि पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठवली आहे.
काळभोर यांनी निवेदनात म्हटले आहे की, पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर संबंधित पुतळा परिसरात सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी महापालिका प्रशासनाची पूर्वपरवानगी, निवडणूक विभागाची आवश्यक परवानगी किंवा अन्य प्रशासकीय मान्यता घेण्यात आली होती का, याची अधिकृत पडताळणी करण्याची मागणी काळभोर यांनी केली आहे. तसेच कार्यक्रमासाठी महापालिकेची मालमत्ता, सुविधा, मनुष्यबळ किंवा अन्य शासकीय संसाधनांचा वापर झाला का आणि आचारसंहितेतील कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन झाले का, याचीही वस्तुनिष्ठ चौकशी करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
पुतळ्याचे अधिकृत उद्घाटन झालेले नसताना आणि परिसरातील काही कामे प्रलंबित असल्याचे सांगितले जात असताना कार्यक्रमासाठी जागा वापरण्याची परवानगी कोणत्या प्राधिकरणाने आणि कोणत्या आदेशानुसार दिली, याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
चौकशीत आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित आयोजक, व्यक्ती किंवा जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात लागू नियमांनुसार कारवाई करावी. तसेच कार्यक्रमाच्या परवानग्या, प्रशासकीय आदेश, जागा वापराची मंजुरी आणि उपलब्ध असल्यास खर्चाची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.