पुणे-संगमनेर-धुळे एसटी सेवेचा राजगुरुनगरमध्ये प्रारंभ, नागरीकांकडून उत्स्फूर्त स्वागत
पुणे, ता. २१ - पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा प्रारंभ अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रविवारी (ता. १९) राजगुरुनगर येथे करण्यात आला. खानदेशातील प्रवाशांची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी पूर्ण झाल्याने नागरिकांनी या सेवेचे स्वागत केले.
पुणे, पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण आणि राजगुरुनगर परिसरात खानदेशातील मोठ्या प्रमाणावर नागरिक वास्तव्यास आहेत. सण, सुट्ट्या किंवा गावाकडे जाण्याच्या वेळी बसची अपुरी उपलब्धता आणि तिकिटांसाठी होणारी धावपळ लक्षात घेता थेट बस सेवेची मागणी सातत्याने होत होती. अखेर राज्य परिवहन महामंडळाने याची दखल घेत ही सेवा सुरु केली. सेवेच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून सुमारे दहा हजार रुपयांपेक्षा अधिक तिकिटांची विक्री झाली.
ही गाडी पुण्यातील त्रपती शिवाजीनगर एसटी स्थानकातून येथून सकाळी ८.३० वाजता सुटते, तर राजगुरुनगर येथून सकाळी ९.३० वाजता पुढे धुळ्याकडे रवाना होते.
राजगुरुनगर खानदेश विकास प्रतिष्ठान तसेच शशिकांत खलाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही बस सेवा सुरु होऊ शकली. या नव्या बस सेवेमुळे पुणे-धुळे मार्गावरील प्रवास अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः खानदेशातील प्रवाशांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरणार आहे. लवकरच या मार्गावर 'शिवाई' बस सेवादेखील सुरु होईल, अशी अपेक्षा नागरीकांनी व्यक्त केली.
शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात राजगुरुनगर आगार प्रमुख उज्वला टाकळकर, बस चालक अविनाश आलट आणि वाहक विकास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. राकेश बेहेरे-पाटील यांनी सत्कार समारंभाचे संयोजन केले.