news
clock
मराठीला ज्ञानभाषा बनविण्याचा वसा सर्वांनी घ्यायला हवा - प्रा. रामनाथ खेडकर

मराठीला ज्ञानभाषा बनविण्याचा वसा सर्वांनी घ्यायला हवा - प्रा. रामनाथ खेडकर

मराठीला ज्ञानभाषा बनविण्याचा वसा सर्वांनी घ्यायला हवा - प्रा. रामनाथ खेडकर

पिंपरी, ता. २८ - '' 'अमृतातेही पैजा जिंके' असा वारसा सांगणारी ही भाषा जगातील अद्वितीय भाषांपैकी एक आहे. मराठी टिकली तरच आपली संस्कृती आणि ओळख टिकणार आहे. मराठी संवादाची भाषा आहे आणि ती ज्ञानाचा समृद्ध खजिना आहे. त्यामुळे मराठीला ज्ञानभाषा बनविण्याचा वसा सर्वांनी घ्यायला हवा.'', असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत व मराठीचे प्राध्यापक रामनाथ खेडकर यांनी केले.

मराठी भाषा गौरव दिन तसेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवीश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी मुख्यालयात विशेष व्याख्यान झाले. 'घेऊया एकच वसा, मराठीला बनवूया ज्ञानभाषा' या विषयावर प्रा. खेडकर बोलत होते.

प्रा. खेडकर यांनी मराठीच्या ऐतिहासिक आणि साहित्यिक प्रवासावर प्रकाश टाकला. खेडकर म्हणाले की, ''जे ज्ञान मायबोलीतून मिळते, ते जगाच्या अन्य कोणत्याही भाषेतून मिळू शकत नाही. नेमकी हीच बाब ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला राजभाषेची मान्यता दिली होती. संतांचा उदात्त वारसा लाभलेल्या या भाषेने महाराष्ट्राला चार ज्ञानपीठ विजेते दिले आहेत. कुसुमाग्रजांनी मराठीला अटकेपार नेण्याचे कार्य केले, तोच वारसा पुढे नेणे आपली जबाबदारी आहे.''

 रुपाली आवले-डंबे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी, सहआयुक्त पुनम मेहता, डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, उपायुक्त हिंमत खराडे, राजेश माशेरे, दक्षता विभागाचे पोलिस निरीक्षक महेशकुमार सरतापे, विकास परवानगी विभागाच्या सहसंचालक स्मिता कलकुट्टी, तहसीलदार आशा होळकर उपस्थित होते. पुरुषोत्तम सांगळे यांनी सूत्रसंचालन केले.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories