news
clock

चिमुकल्या बहिणींनी प्रथमच ऐकली आई-बाबांची हाक

'राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कॉक्लियर इंप्लांट शस्त्रक्रिया यशस्वी

पुणे, ता. १३ - दोन चिमुकल्या बहिणी जन्मतःच मूकबधिर होत्या. आई-बाबांना आणि कुटुंबियांना हे लक्षात आल्यानंतर ते हवालदिल झाले. उपचारांचा खर्च ऐकल्यानंतर तर पुढे काय करावे हे त्यांना समजेना. या परिस्थितीत त्यांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची अन् मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मदत मिळाली. दोन्ही चिमुरड्यांवर कॉक्लियर इंप्लांट शस्त्रक्रिया झाली अन् या भगिनींनी आई-बाबांचा आवाज पहिल्यांदा ऐकला. 

तर गोष्ट अशी की, देहूरस्ता येथे कंपनीत कामगार असलेल्या मल्लेश कानडे यांना 'इंदू' ही पहिली मुलगी झाली. आनंदीआनंद झाला. ही चिमुकली कितीही बोलले तरी प्रतिसाद द्यायची नाही. आई-वडिलांनी दीड वर्षांनी तपासणी केली असता ती मूकबधिर असल्याचे समजले. डॉक्टरांनी तिच्या कॉक्लियर इंप्लांट शस्त्रक्रियेसाठी दहा लाखाचा खर्च सांगितल्याने महिन्याला १३ हजार रुपये पगार असलेल्या कानडी कुटुंबीयांच्या पायाखालची वाळू सरकली. दोन वर्षांनी त्यांना 'गीत' दुसरी मुलगी झाली. तीही मूकबधिर असल्याने दोन्हीही मुली बोलू शकत नसल्याने कुटुंबाला मानसिक धक्का बसला होता.

दोन्ही मुलींच्या २० लाखांच्या शस्त्रक्रिया कशा करायच्या या संकटात  त्यांना जवळच्या अंगणवाडीतून माहिती मिळाली. सहा महिन्यापूर्वी 'राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम' (आरबीएसके) मधील पिंपरी चिंचवड येथील क्रमांक १ च्या पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल पाटील व पथकातील डॉ. प्रिती दिवाणे-भिसे, औषध निर्माण अधिकारी विकास सोळसे व परिचारिका जयश्री बोरचटे त्यांच्या अंगणवाडीमध्ये मुलांची आरोग्य तपासणीसाठी आले. त्यामध्ये त्यांनी तीन वर्षाच्या इंदुची तपासणी केली असता ती मूकबधिर असल्याचे समजले. त्यांनी कानडी कुटुंबीयांना संपर्क केला व योजनेतून तिची शस्त्रक्रिया मोफत करुन देण्याचे आश्वासन दिले आणि चिमुकल्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर काहीसे हसू उमटले.


सर्व वैद्यकीय व प्रशासकीय कागदपत्रांची पूर्तता करुन साडेतीन वर्षांची इंदू व सव्वा वर्षाची गीत या दोघींची कॉक्लियर इंप्लांट शस्त्रक्रिया २८ जानेवारीला मोरया रुग्णालयात कान नाक घसातज्ज्ञ डॉ. अक्षय वाचासुंदर यांनी केल्या आणि आपल्या आई-बाबांची हाक या चिमुकल्यांनी ऐकली.

 सर्व डॉक्टरांचे  आभारी आहोत....

'मला दोन्ही मुलींच्या शस्त्रक्रियेची विवंचना पडली होती. मात्र, 'राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम' (आरबीएसके) व मुख्यमंत्री सहायता निधीतून दोघींच्या शस्त्रक्रिया मोफत झाल्या. आता त्यांना ऐकायला यायला लागले आहे. ही बाब त्यांचा नवीन जन्म झाल्यासारखी असून त्या आता 'वायसीएम' रुग्णालयात स्पीच थेरपी घेत आहेत. आम्ही सर्व डॉक्टरांचे  आभारी आहोत'.

- डॉ. मल्लेश कानडे, देहूरस्ता




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories