नागरीक व नगरसेवकांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यावर जबाबदारीने कार्यवाही करा, महापौर रवी लांडगे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
फ क्षेत्रीय कार्यालयातील विविध विभागांचा महापौरांनी घेतला सविस्तर आढावा
पिंपरी, ता. १० - ''पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांनी समन्वयाने काम करणे अत्यावश्यक आहे. शहर स्वच्छ, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख ठेवण्यासाठी प्लास्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी, कचरा टाकल्या जाणाऱ्या ठिकाणांचे सुशोभीकरण, अतिक्रमणांवर कारवाई करताना फेरीवाल्यांसाठी पर्यायी व्यवस्था तसेच पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसह आवश्यक पायाभूत कामे वेळेत पूर्ण करणे यावर विशेष भर देणे आवश्यक आहे. याशिवाय, नागरिक व नगरसदस्यांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा विहीत वेळेत निपटारा करुन प्रशासनाने जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे.'', महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत आरोग्य, अतिक्रमण, पाणीपुरवठा, स्थापत्य, उद्यान, पशुवैद्यकीय आदी विभागांचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन निगडी येथील ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय येथे करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी नगरसदस्य कुंदन गायकवाड, उत्तम केंदळे, प्रविण भालेकर, यश साने, निलेश नेवाळे, बापू घोलप, नगरसदस्या संगीता ताम्हाणे, योगिता नागरगोजे, शितल वर्णेकर, रिटा सानप, शिवानी नरळे, सोनम मोरे, अर्चना करांडे, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, उपआयुक्त संदीप खोत, प्रदीप ठेंगल, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, कार्यकारी अभियंता हरविंदरसिंह बन्सल, विजयसिंह भोसले, दमयंती पवार, राजेंद्र जावळे तसेच आरोग्याधिकारी व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत प्रभागातील स्वच्छता, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, रस्ते व पायाभूत सुविधा, उद्याने तसेच नागरी सुविधा यासंदर्भातील कामांचा विभागनिहाय आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तातडीने निराकरण करणे तसेच प्रलंबित विकासकामांना गती देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी यावेळी चर्चा करण्यात आली.
या बैठकीत महापौरांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या. शहरातील स्वच्छता, अतिक्रमण नियंत्रण, पाणीपुरवठा, उद्यान व्यवस्थापन आणि पशुवैद्यकीय सेवा या सर्व विभागांनी अधिक समन्वयाने आणि वेळेत काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. प्लास्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याला प्राधान्य द्यावे, ज्या ठिकाणी नागरिक वारंवार कचरा टाकतात त्या ठिकाणी सुशोभीकरण करून तेथील परिस्थितीत बदल घडवावा, तसेच फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर कारवाई करताना त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे तातडीने सुरु करून वेळेत पूर्ण करावीत, उघड्या गटारे व नाल्यांवर सुरक्षेच्या दृष्टीने जाळ्या बसवाव्यात, तसेच शहरातील विविध ठिकाणच्या ड्रेनेज लाईनची स्वच्छता करण्यासाठी आवश्यक यंत्रांची संख्या वाढवावी, असेही त्यांनी सांगितले.
याशिवाय, महापालिकेच्या विविध विभागांनी नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या प्राधान्याने सोडविणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. प्लास्टिकबंदीची काटेकोर अंमलबजावणी, शहर स्वच्छ व सुशोभित ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, तसेच अतिक्रमणाबाबत प्रभावी कारवाई करताना फेरीवाल्यांसाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करणे, उघड्या नाल्यांवर जाळ्या बसविणे आणि ड्रेनेज स्वच्छतेसाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करणे यावर विशेष भर द्यावा. तसेच नगरसदस्य व नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा विहीत वेळेत निपटारा करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करावा. क्षेत्रीय कार्यालयनिहाय श्वान संगोपन केंद्र उभारण्यासाठी नगरसदस्यांसमवेत संभाव्य जागांची पाहणी करावी. या सर्व कामांचा पुढील तीन महिन्यांनी पुन्हा आढावा घेण्यात येईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले.
बैठकीत क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांनी कार्यालयीन संरचना, अतिक्रमण कारवाईचा अहवाल, पोर्टवरील तक्रारींचा निपटारा व प्रलंबित तक्रारी, उत्पन्न व जमा रकमेचा तपशील आदी बाबींबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे महापौर रवि लांडगे यांना माहिती दिली. तसेच नगरसदस्यांनीही प्रभागात आवश्यक असलेल्या सोयीसुविधा आणि समस्या महापौर लांडगे यांच्यासमोर मांडल्या.