11.67 कोटींच्या फसवणूक प्रकरणात सचिन साळुंखे तिहार जेलमधून ताब्यात

11.67 कोटींच्या फसवणूक प्रकरणात सचिन साळुंखे तिहार जेलमधून ताब्यात

पुणे | २७ सप्टेंबर २०२६ : सुमारे ११ कोटी ६७ लाख रुपयांच्या कथित आर्थिक फसवणूक आणि निधी वळविल्याच्या प्रकरणात Eumsig Foodworks Private Limited चे संचालक सचिन चंद्रकांत साळुंखे यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिल्लीतील तिहार जेलमधून ताब्यात घेतले आहे. त्यांना पुण्यात आणल्यानंतर वडगाव न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०४९३/२०२६ दाखल असून, सचिन साळुंखे आणि त्यांची पत्नी श्वेता सचिन साळुंखे, या दोघांना आरोपी करण्यात आले आहे. श्वेता साळुंखे या देखील Eumsig Foodworks Private Limited च्या संचालक आहेत. या दोघांविरोधात महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम, १९९९ (MPID Act) अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वेता साळुंखे या फरार असून त्यांना अद्याप अटक झालेली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

प्रकरणातील एफआयआरनुसार, गुंतवणूक, कंपनीतील संचालकपद, इक्विटी सहभाग आणि परतावा देण्यासंदर्भात विविध आश्वासने देऊन मोठ्या रकमा स्वीकारण्यात आल्या. मात्र, सांगितल्याप्रमाणे त्या रकमा परत करण्यात आल्या नसल्याचा आरोप आहे. विविध कंपन्या आणि बँक खात्यांमधून आर्थिक व्यवहार झाल्याची नोंदही एफआयआरमध्ये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

सचिन साळुंखे हे दिल्लीतील सरिता विहार पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ४२५/२०२२ प्रकरणात जवळपास दोन महिन्यांपासून तिहार जेलमध्ये होते. २६ सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना तेथून ताब्यात घेऊन पुण्यात आणले. 

एफआयआरमध्ये नाशिक, मुंबई आणि दिल्ली येथेही सचिन व श्वेता साळुंखे यांच्याविरोधात आर्थिक फसवणुकीची प्रकरणे असल्याची माहिती फिर्यादीला मिळाल्याचे नमूद आहे. आणखी व्यक्तींची अशाच पद्धतीने फसवणूक झाली आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत. प्रकरणातील आरोपांची चौकशी सुरू असून ते अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories