भेसळीविरोधात आता थेट तक्रार करा, भेसळमुक्त महाराष्ट्रासाठी प्रशासनाचा कडक पवित्रा
पिंपरी, ता. १० ऑगस्ट २०२६ - अन्न व औषध प्रशासनाद्वारे नागरिकांना अन्न व औषधांशी संबंधित गैरप्रकारांविरोधात तक्रार करण्यासाठी टोल-फ्री क्रमांक 1800 222 365 उपलब्ध करून देण्यात आला आहे. या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांना २४ तासात कधीही तक्रार नोंदवता येईल. अन्नपदार्थांमध्ये भेसळ, बनावट किंवा कालबाह्य औषधे, नकली कॉस्मेटिक उत्पादने अथवा अस्वच्छ खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तक्रार नोंदवावी, असे प्रशासनाने सांगितले आहे.
‘Safe Food, Safe Drug, Safe Maharashtra’ या संकल्पनेतून सुरक्षित अन्न आणि सुरक्षित औषधांसाठी जनजागृती व कारवाईला अधिक बळ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपली एक तक्रार… अनेकांचे आरोग्य वाचवू शकते, भेसळीला विरोध करा, आरोग्याच्या हक्कासाठी आवाज उठा आणि सुरक्षित महाराष्ट्राच्या निर्मितीत सहभागी व्हा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
टोल फ्री क्रमांकावर पुढील बाबींविरोधात तक्रार करता येते —
🔹 भेसळयुक्त दूध, तेल, मसाले, मिठाई
🔹 बनावट किंवा कालबाह्य औषधे
🔹 नकली कॉस्मेटिक उत्पादने
🔹 अस्वच्छ हॉटेल, खाद्यपदार्थ व स्ट्रीट फूड
🔹 चुकीचे लेबल किंवा एक्सपायरी डेटमध्ये फेरफार