पिंपरी-चिंचवडमधील सारंगी करंजावणे हिची ‘डर्ट ट्रॅक रेस 2026’मध्ये भरीव कामगिरी
पिंपरी, ता. १० - मोटरस्पोर्ट्स क्षेत्रातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या 37व्या पुणे ‘डर्ट ट्रॅक रेस 2026’ या स्पर्धेत पिंपरी-चिंचवडमधील सारंगी करंजावणे हिने आपल्या पहिल्याच स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. सारंगी चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलची (सूस शाखा) इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी आहे. सारंगीचे हे यश शहरासासाठी अभिमानाची बाब आहे.
गंगाधामजवळील चोरडिया मैदानावर पार पडलेल्या या चित्तथरारक स्पर्धेत राज्यभरातून 225 स्पर्धक सहभागी झाले होते. पुणे फेस्टिवलचे मुख्य संयोजक अभय छाजेड यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ झाला. बक्षीस वितरण नितीन चोरडिया यांच्या हस्ते झाले. ‘रोडीज अॅडव्हेंचर’चे अमरेंद्र साठे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.

या यशाबद्दल बोलताना चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर क्रीडा, साहस आणि विविध कौशल्यांच्या क्षेत्रातही आपली प्रतिभा दाखवणे आवश्यक आहे. सारंगीने दाखवलेले धाडस आणि जिद्द इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. अशा विद्यार्थ्यांमुळे संस्थेचे नाव अधिक उज्ज्वल होते.” शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित यांनीही सारंगीचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “सारंगीची मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास यामुळे तिने हे यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात सातत्याने प्रयत्न केले तर मोठी यशे मिळवता येतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे.”
सारंगीला नॅशनल चॅम्पियन आकाश सातपुते आणि एक्स-टीव्हीएस फॅक्टरी रायडर राहीलेट यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित यांच्यासह पर्यवेक्षक सचिन खोडके, नेहा माळवदे, स्मिता श्रीवास्तव आणि शाळेतील शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले आहे. तिच्या पालकांचेही मोलाचे सहकार्य आणि पाठबळ तिच्या यशामागे महत्त्वाचे ठरले आहे. सारंगीचे वडील सचिन करंजावणे हे प्रसिद्ध बाईक रायडर असून त्यांनी अनेक देशांमध्ये रायडर म्हणून कामगिरी केली आहे. तिची आई एका खाजगी कंपनीत व्यवस्थापिका आहेत.
सारंगीच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे पेरिविंकल स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेचे व्यवस्थापन, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी सारंगीचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. भविष्यातही ती अशाच प्रकारे यशाची नवी शिखरे गाठेल, असा विश्वास सारंगीच्या सर्व शिक्षकांनी व्यक्त केला आहे. मोटरस्पोर्ट्ससारख्या साहसी आणि आव्हानात्मक क्षेत्रात जिद्द, मेहनत आणि धाडसाच्या जोरावर सारंगीने हे यश संपादन केले. तिच्या या कामगिरीची दखल घेत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तिला विशेष रेडिओ मुलाखतीसाठीही आमंत्रित करण्यात आले आहे.