सिक्युरिटीचा व्यवसाय बंद पाडण्याची धमकी देऊन ३ लाख रुपयांची खंडणी घेणाऱ्या आरोपीला अटक, खंडणी विरोधी पथकाची कामगिरी
सिक्युरिटीचा व्यवसाय बंद पाडण्याची धमकी देऊन ३ लाख रुपयांची खंडणी घेणाऱ्या आरोपीला अटक, खंडणी विरोधी पथकाची कामगिरी
पिंपरी, ता. २ जुलै २०२६ - सिक्युरिटीचा व्यवसाय बंद पाडण्याची धमकी देऊन पैसे दिले नाही म्हणून मारून टाकण्याची धमकी देऊन ३ लाख रुपयांची खंडणी स्वीकारणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून ११ लाख ६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मसना ऊर्फ महेश सखाराम शिरोळे (वय २८ वर्षे) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पिंपरी येथील खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात श्रीकांत शामराव बाबर (वय-४४ वर्षे, रा. सर्वे नं. ७३, समर्थनगर, नवी सागंवी) यांनी दिनांक ३० जून २०२६ रोजी खंडणी तक्रार दिली होती की, दिनांक २५ जून २०२६ रोजी ते दिनांक २९ जून २०२६ पर्यंत महेश सखाराम शिरोळे याने स्वतःच्या मोबाईलवरून श्रीकांत बाबर व त्यांचा कंपनीचा सुपरवायझर संदिप कणसे यांना सिक्युरिटीचा व्यवसाय चालवायचा असेल तर पहिले दहा लाख, त्यानंतर ८ लाख, त्यानंतर ७ लाख त्यानंतर ६ लाख रुपये दयावे लागतील, अन्यथा माझ्या पध्दतीने मी तुम्हाला बघून घेतो, माझी चाकण येथे मोठी दहशत असून सांगितल्याप्रमाणे ६ लाख रुपये दे नाहीतर तुला मी खल्लास करून टाकतो, अशी धमकी दिली व त्यानुसार आजच (ता. ३०) ३ लाख रुपये द्यायचे ठरले आहे.
या तक्रारीनंतर, खंडणी विरोधी पथकाने महेश शिरोळे यास ठरल्याप्रमाणे अर्जदार बाबर यांच्या कंपनीतील सुपरवायझर संदिप कणसे यांच्या ताब्यात भारतीय चलनाच्या ५००/-रुपये दराच्या १२ नोटा व चिल्ड्रन बँक ऑफ इंडीया नावाच्या ५००/- रुपयांच्या नोटेप्रमाणे हुबेहुब दिसणाऱ्या ५८८ डमी नोटा, १०० नोटाचा एक बंडल, त्यामध्ये वरच्या व खालच्या बाजूस १ खरी नोट लावलेली व मध्यभागी ९८ डम्मी नोटा लावलेल्या अशाप्रमाणे ६ बंडल तयार करून, त्यावर रबर लावून ते पैसे प्लास्टीक पिशवीमध्ये ठेवून, दिले.
नंतर, सापळा रचून महेश शिरोळे (रा. मेदनकरवाडी, ता. खेड) याला मॅक्झिन चौक-दिघी येथे ३,००,०००/- रुपये खंडणी म्हणून स्वीकारताना ताब्यात घेतले. त्याच्याकडून एकूण ११ लाख ६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. आरोपी मसना ऊर्फ महेश सखाराम शिरोळे (वय २८ वर्षे) याच्याविरुध्द भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०८ (२), ३०८ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कार्यवाहीसाठी दिघी पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त गुन्हे सारंग आव्हाड, पोलिस उप-आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे-२ प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक अमर राऊत, सुनिल कानगुडे, प्रदिप पोटे, प्रदीप गोडांबे, किशोर कांबळे, गणेश गिरीगोसावी, चंद्रकांत जाधव, किरण जाधव, संदिप गंगावणे, निलेश जाधव यांचे पथकाने केली आहे.