शिरगावमध्ये ग्रामस्थांनी एकत्र येऊन केली वनराई बंधाऱ्यांची बांधणी
पिंपरी, ता. २० - शिरगाव (ता. मावळ) येथे ग्रामस्थांनी एकत्र येऊन वनराई बंधाऱ्यांची बांधणी केली आहे.पुणे जिल्हा परिषद व मावळ पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत बंधाऱ्यांची बांधणी करण्यात आली आहे. या उपक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे.
गावातील ओढे व नाल्यांमध्ये वनराई बंधारे बांधून 'पाणी अडवा - पाणी जिरवा' ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरवली. या बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी साठवून ते जमिनीत मुरण्यास मदत होणार आहे आणि भूजलपातळी वाढीस मदत होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढून विहिरी व विंधन विहिरी यांना पाणी मिळणार आहे.
या श्रमदानात आमदार प्रकाश देवळे माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थी व शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कामात सहभागी होऊन बंधारे निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली. शिक्षकांनी मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सांगितले. ग्रामस्थांच्या एकीतून उभारण्यात आलेले हे बंधारे जलसंधारणासाठी महत्वाचे ठरणार आहेत.