क्रिडा शिक्षकांना निवडणूक व इतर प्रशासकीय कामांतून मुक्त करावे - शहराध्यक्ष अरुण पाडुळे
क्रिडा शिक्षकांना निवडणूक व इतर प्रशासकीय कामांतून मुक्त करावे - शहराध्यक्ष अरुण पाडुळे
पिंपरी, ता. १५ - पिंपरी चिंचवड शहराची ओळख “क्रिडा नगरी” म्हणून निर्माण व्हावी, यासाठी क्रीडा शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, त्यांनाच निवडणूक व इतर प्रशासकीय कामांमध्ये गुंतवले जात असल्याने खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे खेळाडू व पालकांमध्ये नाराजी आहे. क्रिडा शिक्षकांना या प्रशासकीय कामकाजातून तत्काळ मुक्त करावे, अशी मागणी भाजप क्रीडा प्रकोष्ट शहराध्यक्ष अरुण पाडुळे यांनी केली आहे.
याबाबत महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले आले. यावेळी नगसेवक कुंदन गायकवाड, नगरसेविका योगीता नागरगोजे, सामाजिक कार्यकर्ते सचिन सानप उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड हे औद्योगिक नगरी म्हणून देशभर ओळखले जाते; मात्र या शहराची ओळख क्रीडा क्षेत्रातही निर्माण व्हावी, असे अनेक खेळाडूंचे स्वप्न आहे. मात्र सध्या क्रीडा शिक्षकांना निवडणूक तसेच इतर प्रशासकीय जबाबदाऱ्या देण्यात येत असल्याने ते मैदानावर कमी आणि कागदपत्रांच्या कामात अधिक गुंतले जात आहेत. परिणामी, होतकरू खेळाडूंना योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शनापासून वंचित राहावे लागत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
महानगरपालिकेच्या शाळांमधील क्रीडा शिक्षकांना निवडणूक व क्रिडा विषयाशी संबंधित नसलेल्या कामकाजातून मुक्त करावे, तसेच शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नवीन क्रीडा शिक्षकांची भरती प्रक्रिया तातडीने राबवावी. आज ठोस निर्णय घेतला नाही, तर भविष्यातील अनेक राष्ट्रीय खेळाडू घडण्याआधीच थांबतील. खेळाडू घडले तरच शहराचे नाव देश-विदेशात उज्ज्वल होईल. क्रीडा शिक्षक हे केवळ शिक्षक नसून ते भविष्यातील राष्ट्रीय खेळाडू घडवणारे शिल्पकार आहेत. त्यांना निवडणूक आणि इतर प्रशासकीय कामांमध्ये अडकवणे म्हणजे खेळाडूंच्या स्वप्नांवर अन्याय करण्यासारखे आहे. जर आपल्याला पिंपरी चिंचवडला खऱ्या अर्थाने ‘क्रीडा नगरी’ बनवायचे असेल, तर क्रीडा शिक्षकांना तात्काळ गैर-क्रीडा कामकाजातून मुक्त करून त्यांना मैदानावर परत आणणे अत्यावश्यक आहे, असे पाडुळे यांनी म्हटले आहे.