एसटी महामंडळ १ मे पासून राज्यभरात राबवणार 'आपली बस, आपली सेवा' अभियान
एसटी सेवा अधिक विश्वासार्ह, सुलभ, समाधानकारक करण्यासाठी उपक्रम
पुणे, ता. २७ - प्रवाशांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी त्यांना सुखकर प्रवास घडवून आणण्यासाठी राज्य परिवहन मंडळाकडून १ मे पासून 'आपली बस, आपली सेवा' अभियान राज्यभर राबवले जाणार आहे. याबाबतची घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यानुसार एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी परिपत्रक जारी केले.
याबाबत बोलताना सरनाईक म्हणाले की, ''एसटीची प्रवासीसंख्या आणि महसूल वाढवण्यासाठी 'आपली बस, आपली सेवा' हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बसस्थानके स्वच्छ, सुरक्षित आणि व्यवस्थित ठेवण्यावरही भर देण्यात येणार आहे. या अभियानात चालक आणि वाहक हे केवळ कर्मचारी न राहता 'सेवक' बनणार आहेत. बस सुटण्यापूर्वी चालकाने स्वतःची ओळख करुन देऊन प्रवाशांना प्रवासाचा मार्ग, थांबे आणि अपेक्षित वेळ याची माहिती देणार आहेत. बस रद्द होणे किंवा मार्गात अडथळे निर्माण होणे या अनपेक्षित परिस्थितीत प्रवाशांना तत्काळ पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. प्रवाशांच्या तक्रारींना केवळ नोंद न करता त्यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येईल. प्रत्येक स्तरावर नियमित आढावा घेऊन सेवेतील उणिवा दूर करण्यावर भर दिला जाणार आहे.''
या अभियानात प्रवाशांचाही सहभाग महत्त्वाचा मानण्यात आला आहे. एसटी स्थानक परिसरात व बसमध्ये स्वच्छता राखणे, सामानाची जबाबदारी घेणे आणि प्रवासादरम्यान शिस्त पाळणे अभिप्रेत आहे. डिजिटल सेवांचा वापर वाढवण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड आणि ऑनलाइन आरक्षणाला प्रोत्साहन दिले जाणार आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.
एसटी सेवा सेवा अधिक विश्वासार्ह, सुलभ करणारे अभियान.....
'आपली बस, आपली सेवा' हे अभियान १ मेपासून महाराष्ट्रात सुरु होत आहे. प्रशासकीय बदलांपुरते हे अभियान मर्यादित नसून, एसटी आणि प्रवासी यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न आहे. एसटी सेवा सेवा अधिक विश्वासार्ह, सुलभ, समाधानकारक व सन्मानाची करण्यासाठी हे अभियान महत्त्वाचा टप्पा ठरेल.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री