भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नी नागरीकांचे थेट मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन
पिंपरी, ता. २० - निगडी-प्राधिकरण परिसरात भटक्या श्वानांमुळे भितीचे वातावरण आहे. कारण, गेल्या काही दिवसांत भटक्या श्वानांनी नागरिकांवर हल्ला केल्याच्या दहा घटना घडल्या आहेत. स्थानिक नागरीकांनी वारंवार महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, महापालिकेने काहीच उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे, स्थानिक नागरिकांनी थेट मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे तक्रार केली आहे.
या निवेदनामध्ये, 'मुख्यमंत्री महोदय, आम्हांला वाचवा' अशी विनंती निगडी-प्राधिकरणातील नागरीकांनी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, आकुर्डी रेल्वे स्थानक, दत्त मंदिर, गजानन महाराज मंदिर, सेक्टर २७, सेक्टर २४, शाळा परिसर, सोसायट्यांच्या आवारात सर्वत्र या मोकाट श्वानांचा वावर वाढल्याने नागरिक, शालेय विद्यार्थी कमालीचे त्रासले आहेत. या मोकाट श्वानांना पाहून शाळकरी विद्यार्थी घाबरून पळतात. हे श्वान या मुलांचा पाठलाग करतात. त्यामुळे, विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
निगडी-प्राधिकरणातील अनेक नागरीक दररोज दररोज दादा-दादी विरंगुळा केंद्रात येतात. पण, तेथेही दहा ते पंधरा श्वान एकमेकांच्या अंगावर धावून जात आहेत. यामुळे श्वानांच्या भितीने फिरायला येणाऱ्या नागरिकांची संख्याही कमी झाली आहे.
याबाबत, स्थानिक ज्येष्ठ नागरीक दत्ता धामणस्कर म्हणाले, '' शहरामध्ये भटक्या श्वानांची वाढ होऊन ते रहिवाशांना चावत आहेत. नागरिक भयभीत आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन दोन्हींनी नागरिकांच्या समस्यांकडे वेळीच लक्ष दिले नाही. त्यामुळे नागरिकांना अखेर मुख्यमंत्र्यांकडे बाजू मांडावी लागत आहे. यासंबंधी प्राधिकरणातील नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे दिलेल्या निवेदन करावे लागले आहे.''