थेरगाव | २८ सप्टेंबर २०२६ : डीजे आणि डॉल्बीला पूर्णपणे फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात थेरगाव येथील वनदेव आनंदवन मित्र मंडळाने यंदाचा गणेशोत्सव साजरा केला. मंडळाचे संस्थापक तथा स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या पुढाकारातून गणेशोत्सवात धार्मिक कार्यक्रमांसोबत आरोग्य तपासणी, बालजत्रा आणि पर्यावरणपूरक विसर्जनावर भर देण्यात आला.
गणेशोत्सवाला अभिनेत्री उर्मिला कानेटकर, पूर्णिमा डे, स्नेहलता माघाडे तसेच नृत्यांगना प्रियांका जाधव यांनी भेट दिल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
विसर्जन मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण माता जोगेश्वरी आणि काळभैरवनाथ यांच्या विवाह सोहळ्याचा जिवंत पौराणिक देखावा ठरला. मंडळाच्या माहितीनुसार, हा देखावा पाहण्यासाठी आणि गणरायाला निरोप देण्यासाठी परिसरातील सुमारे १५ ते २० हजार नागरिकांनी उपस्थिती लावली. डीजे-डॉल्बीऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करत मिरवणूक काढण्यात आली.

गणेशोत्सवाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त मंडळाने ‘आरोग्याचा श्रीगणेशा’ हा आरोग्य तपासणी उपक्रमही राबविला. यामध्ये ओपीडी तपासणी, रक्तदाब, रक्तातील साखर, असंसर्गजन्य रोगांची तपासणी व मार्गदर्शन तसेच आभा कार्ड आणि आयुष्मान कार्डबाबत माहिती देण्यात आली. या उपक्रमाचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतल्याचे आयोजकांनी सांगितले. लहान मुलांसाठी विशेष ‘बालजत्रा’ आयोजित करण्यात आली होती.

विसर्जनादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंगचे नियोजन करण्यात आले होते. ध्वनीप्रदूषण टाळण्यावर भर देत विशेष जलकुंडांचा वापर करून गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आल्याचे मंडळाने म्हटले आहे.
“गणेशोत्सव हा केवळ आनंद साजरा करण्याचा सण नसून समाजाला जोडण्याचे आणि उत्तम संस्कार रुजवण्याचे प्रभावी माध्यम आहे. तरुणांनी आणि मंडळांनी डीजेच्या संस्कृतीतून बाहेर पडून आपल्या समृद्ध परंपरेकडे आणि समाजहिताच्या कार्याकडे वळणे गरजेचे आहे,” असे अभिषेक बारणे यांनी सांगितले.