वीज समस्या सोडवण्यासाठी नागरिकांची महावितरण कार्यालयाला भेट, महावितरणकडून तातडीच्या उपाययोजनांचे आश्वासन
वीज समस्या सोडवण्यासाठी नागरिकांची महावितरण कार्यालयाला भेट, महावितरणकडून तातडीच्या उपाययोजनांचे आश्वासन
पिंपरी, ता. १५ - देहूरोड येथील थॉमस कॉलनी परिसरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि १४ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या उच्चदाब (हाय-व्होल्टेज) तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी एकत्रित पुढाकार घेतला आहे. या घटनेमुळे परिसरातील अनेक घरांतील विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे.
रहिवासी संजय डुमडे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, या वीज समस्येवर उपाययोजना करण्यासाठी बुधवारी (ता. १५) थॉमस कॉलनीतील नागरिकांनी एकत्रितपणे महावितरण (MSEDCL) कार्यालयात भेट देऊन सहाय्यक अभियंत्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी लेखी निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. महावितरणकडून जळालेले वीज मीटर लवकरात लवकर बदलून देण्यात येतील, असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. तसेच परिसरातील जुन्या वीजतारा आणि खांबांमुळे होणारे शॉर्ट सर्किट टाळण्यासाठी मुख्य वीजवाहिनी भूमिगत (अंडरग्राउंड) करण्याची नागरिकांनी ठाम मागणी केली आहे.
या मागणीवर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच पुढील कार्यवाही सुरू केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, हे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नागरिकांच्या एकजुटीमुळे हा प्रश्न प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचल्याचे समाधान नागरीकांनी व्यक्त केले.