पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील तीन अधिकारी सेवानिवृत्त

पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील तीन अधिकारी सेवानिवृत्त

पिंपरी-चिंचवड | ३० सप्टेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील नियत वयोमानानुसार सप्टेंबर २०२६ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या तीन पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा सत्कार व निरोप समारंभ मंगळवारी पोलीस आयुक्तालयातील ‘शिवनेरी हॉल’ येथे पार पडला.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सेवानिवृत्त अधिकारी आणि अंमलदारांचा त्यांच्या कुटुंबीयांसह सन्मान करण्यात आला.

सप्टेंबर महिन्यात सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये वाहतूक विभागातील पोलीस उपनिरीक्षक रविंद्र सदाशिव आहेरराव, वाहतूक विभागातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय व्यंकटेश कामठे आणि पोलीस मुख्यालयातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण सहादू बुर्डे यांचा समावेश आहे.

कार्यक्रमात पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर आणि पोलीस उपायुक्त (मुख्यालय) गणेश इंगळे यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकारी-अंमलदारांचा कुटुंबीयांसह शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सेवानिवृत्ती प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र, स्मृतिचिन्ह, झाडाचे रोपटे आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी-अंमलदारांना पुढील आयुष्य निरोगी आणि आनंदी जावो, अशा शुभेच्छाही देण्यात आल्या.

या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नरवाडे (कल्याण शाखा), सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश भामरे (कल्याण शाखा), तसेच सेवानिवृत्त होणारे अधिकारी-अंमलदार, त्यांचे नातेवाईक आणि पोलीस आयुक्तालयातील इतर अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories