तळेगाव एमआयडीसी येथे बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
पिंपरी, ता. १० - तळेगाव एमआयडीसी परिसरातील भीषण अपघात झाला. खासगी कंपनीच्या बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास मावळ तालुक्यातील नवलाख उन्ने गावच्या हद्दीत नॉर्मा कंपनीसमोरील तळेगाव एमआयडीसी रोडवर हा अपघात झाला. पुष्पेंद्र कुमार रामसेवक व्यास (वय ४१) हे ह्युंदाई कंपनीत कामासाठी त्यांच्या स्प्लेंडर दुचाकी (एमएच १४ एमएक्स ५७१०) वरुन नवलाख उन्ने येथून नॉर्मा चौकात रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी वडगाव बाजूकडून मंगरूळकडे जात असलेल्या फोर्स कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या बसने (एमएच १४ सीडब्ल्यू १२६०) भरधाव वेगात येऊन दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.
या अपघातात पुष्पेंद्र व्यास यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर बस चालक घटनास्थळी न थांबता पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी फिर्यादी रामसेवक व्यास (रा. बमोरी बहराणा, ता. लिघोराबडा, जि. टिकमगड) यांच्या फिर्यादीवरून ९ मार्च २०२६ रोजी दुपारी १२.५१ वाजता तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ), १०६ (१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ व १३४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.