पिंपरी | २१ सप्टेंबर २०२६ : टाकाऊ वस्तूंचा कल्पकतेने पुनर्वापर, रंगरंगोटी आणि परिसराची स्वच्छता करत पिंपरी-चिंचवड महापालिकेने चऱ्होली बुद्रुक येथील वाघेश्वर घाट परिसराला आकर्षक स्वरूप दिले आहे. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत महापालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक ३ मधील साठेनगर परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला.
स्वच्छता लक्ष्य क्षेत्रांतर्गत रस्त्यालगत आणि सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा हटवून परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर उपलब्ध सार्वजनिक जागेचे सुशोभीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे, नागरिकांनी वापरातून बाद केलेल्या आणि टाकून दिलेल्या वस्तूंना रंगरंगोटी करून त्यांचा कलात्मक पद्धतीने पुनर्वापर करण्यात आला. त्यामुळे परिसराला आकर्षक स्वरूप मिळाले.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. स्वच्छतेसोबत उपलब्ध जागांचे सुशोभीकरण आणि टाकाऊ वस्तूंचा सर्जनशील पुनर्वापर केल्यास परिसराचा चेहरामोहरा बदलू शकतो. स्वच्छ आणि सुंदर पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे.
उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानातून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयीची जाणीव अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी नागरिकांना ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा स्वतंत्रपणे संकलित करून महापालिकेच्या घंटागाडीतच देण्याचे आवाहन करण्यात आले. उपस्थित नागरिक, विद्यार्थी आणि शिक्षकांना स्वच्छतेची शपथही देण्यात आली.