रहाटणीत बिल्डरकडून अनधिकृत तीन मजले; मंजूर नकाशाचे उल्लंघन!

रहाटणीत बिल्डरकडून अनधिकृत तीन मजले; मंजूर नकाशाचे उल्लंघन!

रहाटणी | 21 सप्टेंबर 2026 : रहाटणीतील मे. साई बिल्डकॉनच्या ‘साई संकुल’ गृहप्रकल्पात मंजूर नकाशाचे उल्लंघन करून तीन अनधिकृत मजले उभारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या अनधिकृत मजल्यांवरील 14 फ्लॅटची सर्वसामान्य नागरिकांना विक्री करून कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याप्रकरणी बिल्डरवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

वृत्तानुसार, रहाटणी येथील सर्व्हे क्रमांक 64/1/1, 64/1/3, 63/1/4, 64/1/4 या मिळकतींमध्ये सुमारे 43.50 आर क्षेत्रावर साई बिल्डकॉनचे विकासक पवन वाधवानी यांच्या नावे ‘साई संकुल’ प्रकल्प उभारला. मंजूर नकाशानुसार ‘ए’ इमारतीमध्ये तळमजला अधिक सहा मजले आणि ‘बी’ इमारतीमध्ये तळमजला अधिक तीन मजल्यांना परवानगी होती. मात्र, ‘ब ’ इमारतीत चौथा, पाचवा आणि सहावा असे तीन अतिरिक्त अनधिकृत मजले उभारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे याबाबत तक्रारी करण्यात आल्या. दरम्यान, महापालिकेच्या मंजुरीपेक्षा जास्त मजले उभारून फ्लॅट विकल्याप्रकरणी बिल्डरवर एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. बांधकाम विभागाकडून केवळ नोटिसा देण्यात आल्या; मात्र ठोस कारवाई झाली नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवक विनोद नढे यांनी आक्रमक भूमिका घेत आयुक्त आणि बांधकाम विभागाला स्मरण पत्र देत या प्रकल्पातील अनधिकृत बांधकाम केलेल्या चौथ्या,पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर निष्कासनाची आणि संबंधित विकासकावर एम आर टी पी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून कारवाईस आणखी विलंब झाल्यास नागरी हितासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories