वाकडमध्ये टेम्पोच्या टपावर बसलेल्या २० वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू

वाकडमध्ये टेम्पोच्या टपावर बसलेल्या २० वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू

वाकड | ६ ऑक्टोबर २०२६ : अंडरपासच्या वरील कॉलमला धडक बसल्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना वाकड येथे घडली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी ताब्यात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ६ ऑक्टोबर रोजी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास सॉलिटेअर सोसायटी, पिंक सिटी रोड, वाकड येथे घडली. धनंजय श्रीनिवास कुट्टे (वय ५०, रा. महादेव कॉलनी, शंकर मंदिराजवळ, लक्ष्मीनगर, थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी टाटा टेम्पो (क्र. MH 14 LB 4518) चालक तुषार ज्योतीराम माने (वय २२, रा. आदेश कॉलनी, वाकड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा ऋषी धनंजय कुट्टे (वय २०, रा. लक्ष्मणनगर, लक्ष्मीबाई गार्डनजवळ, थेरगाव) हा टेम्पोच्या टपावर बसलेला असल्याची माहिती चालकाला होती. तरीही चालकाने वाहन हयगयीने, निष्काळजीपणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सॉलिटेअर सोसायटीच्या अंडरपासमधून टेम्पो जात असताना अंडरपासच्या वरील कॉलमला ऋषी यांच्या डोक्याला धडक बसली. या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories