चाकण | ६ ऑक्टोबर २०२६ : विनापरवाना आणि बेकायदेशीररीत्या देशी बनावटीचे पिस्तूल बाळगून मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी २४ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने पकडले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे असा एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३२ वाजण्याच्या सुमारास मौजे वाकी खुर्द, ता. खेड, जि. पुणे गावच्या हद्दीत स्मशानभूमीजवळ, जुने पुणे-नाशिक महामार्गाच्या रोडलगत करण्यात आली. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस अंमलदार सुधीर शिवाजी दांगट (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात प्रवीण रमेश इचके (वय २४, रा. कवठे येमाई, ता. शिरूर, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे. तर मेहबूब मकबूल नदाफ (रा. वाकी खुर्द, ता. खेड, जि. पुणे) हा पाहिजे आरोपी आहे.
फिर्यादीनुसार, प्रवीण इचके याच्याकडे विनापरवाना आणि बेकायदेशीररीत्या एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण ५२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. तसेच पोलीस आयुक्त कार्यालयाकडून लागू करण्यात आलेल्या मनाई आदेशाचा भंग झाल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
सदर शस्त्र मेहबूब मकबूल नदाफ याच्याकडून खरेदी केल्याचे आरोपीने सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी उत्तर चाकण पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनभुले करीत आहेत.