''विद्यार्थ्यांनो, सुचलेल्या कल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करा'' - रामहरी कुटे
''विद्यार्थ्यांनो, सुचलेल्या कल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करा'' - रामहरी कुटे
चिंचवड येथील यशस्वी मॅनेजमेंट सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये 'व्यवस्थापनातील नाविन्यता आणि माहिती तंत्रज्ञान' या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद
पिंपरी, ता. ११ - ''चौकटीबाहेरचा नाविन्यपूर्ण विचार करण्याची क्षमता आपल्याला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुचलेल्या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. केवळ अभ्यासक्रमापुरते किंवा परीक्षेसाठी अभ्यास न करता, त्या ज्ञानाचा व्यावहारिक जीवनात वापर करण्यासाठी प्रयत्नशील व्हायला हवे.'' असे मार्गदर्शन स्कोडा ऑटो वोक्सवॅगन इंडिया प्रा. लि. कंपनीच्या कर्मचारी संबंध विभागाचे प्रमुख रामहरी कुटे यांनी केले.
चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने 'व्यवस्थापनातील नाविन्यता आणि माहिती तंत्रज्ञान' या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कुटे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मलेशियाचे परदाना विद्यापीठ, नेपाळच्या पोखरा विद्यापीठाचे युनि ग्लोब कॉलेज, मलेशियाचे म्हासा विद्यापीठ, इंडो युरोपियन एज्युकेशन फाउंडेशन आणि मॉरीशसची मनुष्यबळ व्यवस्थापन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले.
कुटे म्हणाले, ''वास्तव जगातील एखाद्या घटनेकडे तुम्ही कशाप्रकारे बघता, तुम्हाला अमुक एखादी घटना, प्रसंग समस्या वाटते का संधी वाटते हे केवळ तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. म्हणजेच तुमचा दृष्टिकोन, विचार करण्याची पद्धत, नावीन्यपूर्ण पद्धतीने काम करण्याचे कौशल्य यामुळेच यश मिळते. आपल्या प्रत्येकाला अनेक कल्पना सुचत असतात, मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला काहीतरी भरीव कामगिरी करण्याची इच्छा असेल तर आपण आपल्याला सुचणाऱ्या कल्पनांची यादी लिहून ठेवण्याची सवय लावून घ्यायला हवी, सुचलेल्या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवे. प्रसंगी अपयश आले तरीही हताश न होता सातत्याने त्या कल्पनेचा ध्यास घेऊन कृतीशील राहिल्यास निश्चित यशस्वी होता येते. तसेच प्रचंड वेगाने बदलणाऱ्या सध्याच्या जगात नाविन्यपूर्ण पद्धतींमध्येही सातत्याने बदल होत आहे, याबाबत विद्यार्थ्यानी लक्ष ठेवून नावीन्यतेचा सातत्याने विचार करायला हवा''
यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी म्हणाले, ''परिषदेतील विद्यार्थ्यांना त्यांच्यातील संशोधकवृत्ती जोपासून केवळ शोधनिबंध प्रसिद्ध करण्यासाठी संशोधन मर्यादित न ठेवता वास्तव जगातील समस्या सोडविण्यासाठी, नवनिर्मितीसाठी करण्यासाठी संशोधन उपयोगात आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा.''
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या शोधनिबंध संक्षिप्त पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले. आयआयएमएस च्या एमबीए व एमसीए विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरीसाठी प्रशस्तीपत्र व बक्षिस देऊन गौरवण्यात आले. यावेळी आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे, आयटीएस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक केदार खळदकर, अमेरिकेतील फेनॉम पेन्ह, कंबोडिया विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. शाद खान (दूरदृशप्रणालीद्वारे) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या परिषदेत देश परदेशातील १३० संशोधन प्रबंध सादर करण्यात आले.
परिषदेच्या पहिल्या दिवशी मॉरिशसच्या ला-सेंटीनेले ग्रुपचे सीईओ आरिफ सालारू, एम्डॉक्सच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग विभागाचे संचालक डॉ. रवींद्रपाल सिंग, टीसीएस कंपनीच्या अकाउंट सर्विसेस विभागाचे व्यवस्थापक मनोजकुमार चौधरी, डॉ. डी. वाय. पाटील व्यवस्थापन व संशोधन संस्थेचे प्रा. डॉ. सुनील धनवडे, प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे संचालक डॉ. सचिन बोरगांवे, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट अँड कॉम्युटर ऍप्लिकेशन संस्थेच्या प्रा. पूनम सावंत, रतन टाटा महाराष्ट्र राज्य विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. सुनील जोशी, एलटीआय माईंड ट्री चे वरिष्ठ संचालक अभिजित पुरी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सन्तनुराव किर्लोस्कर अध्यासनाचे माजी प्रमुख प्रा. डॉ. कॅप्टन सी. एम. चितळे यांची व्याख्याने झाली.तर द्वितीय सत्रात संशोधन प्रबंधांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल गौड, अपर्णा मिसाळ, आज्ञा पाटील व प्रीती शेडोळे या विद्यार्थिनींनी केले.