मद्यपींच्या सर्रास वावरामुळे चिखलीतील बसथांबा हटवण्याची मागणी, नगरसेवक यश साने यांचे पीएमपी प्रशासनाला निवेदन
पिंपरी, ता. ७ - चिखली परिसरातील शिवरकर चौकातील 'पीएमपीएमएल'च्या बसथांब्यावर कोणतीही बस थांबत नसल्याने हा थांबा सध्या मद्यपींचा अड्डा बनला आहे. परिसरातील नागरिकांसाठी हे त्रासदायक आहे. त्यामुळे हा सध्या निरुपयोगी असलेला बसथांबा लवकरात लवकर हटवावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक यश साने यांनी पीएमपीएमएल प्रशासनाकडे केली आहे.
या संदर्भात यश यांनी पीएमपीएमएलच्या वाहतूक व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, चिखलीमधील शिवरकर चौकातील बस थांब्यावर गेल्या काही काळापासून कोणतीही बस सेवा सुरु नसल्यामुळे थांबा धूळ खात पडून आहे. त्यामुळे येथे रात्रीच नाही तर दिवसाही मद्यपींचा वावर असतो. अनेकजण याठिकाणी धूम्रपान करत बसलेले असतात. त्यामुळे, स्थानिक नागरीक वैतागले आहेत. याबाबत नागरीकांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे, परिसरातील शिस्त व स्थानिक नागरीकांच्या सुरक्षितेतेसाठी सदर बसथांबा येथून हटवावा. पीएमपी प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी नागरीकांची अपेक्षा आहे.