शिक्षणसंस्था व उद्योगांनी एकत्र येऊन परस्परपूरक अभ्यासक्रम राबवावेत - एम. शेख 

“इंडिया एआय मिशन” अंतर्गत पिंपरी-चिंचवड विद्यापीठात “इंडिया एआय इम्पॅक्ट समिट”चे आयोजन

पिंपरी, ता. ९  - ''नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणसंस्था व उद्योगांनी एकत्र येऊन परस्परपूरक अभ्यासक्रम तयार करुन राबविले पाहिजेत. जेणेकरुन पुस्तकी ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव यातील दरी कमी करता येईल. भविष्यात उद्योगांचे यश नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित असेल त्यामुळे शैक्षणिक संस्थांनी सतत बदलत्या अभ्यासक्रमाशी सुसंगत राहिले पाहिजे.'', असे मत सास ऑटोमेशनचे व्यवस्थापकीय संचालक एम. शेख यांनी व्यक्त केले. 

केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय “इंडिया एआय मिशन” अंतर्गत, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी-चिंचवड विद्यापीठात (पीसीयू) “इंडिया एआय इम्पॅक्ट समिट - २०२६ ”चे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पेल टेक्नॉलॉजीज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र कुमार शर्मा, पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, प्रभारी कुलगुरु डॉ. सुदीप थेपडे, एमडॉक्स इंडिया कंपनीचे अंजन बिस्वास, इंजीनित यरिंग सर्व्हिसेस प्रमुख रंजीत माथुर, उपसंचालक अंजू बेनीवाल, माहिती तंत्रज्ञान तज्ञ डॉ. पूर्वा शर्मा, पीसीयू आंतरराष्ट्रीय संबंध संचालक डॉ. शंकर देवस्कार, संशोधन व विकास संचालक डॉ. भरत काळे आदी उपस्थित होते. प्रारंभी शेख यांनी मार्गदर्शन केले.

“स्किल इंडियाच्या दिशेने एक झेप – उद्योग आणि शिक्षण क्षेत्राच्या सहकार्यातून महत्त्वाकांक्षी तरुण भारतीय मन घडवणे” (Leap towards skill India –  creating young aspiring Indian minds through industry – academia collaboration) या विषयावर शिक्षण व उद्योग क्षेत्रातील मान्यवरांची गटचर्चा घेण्यात आली.

यामध्ये, स्पेल टेक्नॉलॉजीज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांनी सांगितले की, ''औद्योगिक विकासाचा पुढील टप्पा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग या क्षेत्राचा आहे. विशाल दृष्टिकोन ठेवला तर उत्पादन व सेवा क्षेत्रात यामुळे मोठी गुंतवणूक आणि रोजगार संधी उपलब्ध होतील. ''

अंजन विश्वास यांनी सांगितले की, ''एआय ही अणुऊर्जेप्रमाणे सर्वच क्षेत्रात अमुलाग्र परिवर्तन करणारी कार्यशक्ती आहे. पुढील काळात यायचा जबाबदार व नैतिक वापर करावा लागेल. विकसित भारत घडविण्यात याची भूमिका विशेष असेल. परंतु अंदाधुंद अवलंबित्व आणि डीप फेक पासून सावध राहिले पाहिजे.'' डॉ. पूर्वा शर्मा म्हणाल्या की, ''शेती, शिक्षण याचबरोबर उदयन्मुख क्वांटम तंत्रज्ञानात देखील एआयचा वापर लाभदायी ठरेल.'' रंजीत माथुर यांनी सांगितले की, पर्यावरण, हवामान, प्रदूषण अशा सामाजिक प्रश्नांवर कृती कार्यक्रम तयार करण्यासाठी आणि पुढील पिढीच्या शाश्वत भविष्यासाठी हे तंत्रज्ञान मार्गदर्शक आहे.

''केंद्र सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे चर्चासत्र पीसीओ मध्ये होत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. हे चर्चासत्र म्हणजे पुढील काळात नवी दिल्ली येथे होणाऱ्या शिखर परिषदेची पूर्वतयारी आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योग क्षेत्रातील तज्ञांची संवाद साधण्याची संधी मिळते.'' असे मत पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी मांडले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील,  नियामक समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.  

--------------------------------------------------------------------------------------------------------------

 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance