'महाचतुर एआय चॅटबॉट'मुळे युवा वर्गाचा शिक्षण ते रोजगार हा प्रवास अधिक सुकर होईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
'महाचतुर एआय चॅटबॉट'मुळे युवा वर्गाचा शिक्षण ते रोजगार हा प्रवास अधिक सुकर होईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, ता. २८ - ''राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा 'महाचतुर एआय चॅटबॉट' हा महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी उपक्रम आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढाकारातून विकसित करण्यात आलेला हा चॅटबॉट देशात राज्य शासनाने तयार केलेला अशा प्रकारचा पहिलाच अभिनव उपक्रम आहे. या चॅटबॉटमुळे युवा वर्गाचा शिक्षण ते रोजगार हा प्रवास अधिक सुकर होईल आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होईल.'', असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘चॅटबॅाट’लोकार्पण प्रसंगी केले.
महाराष्ट्रात कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग प्रभावीपणे काम करत असून उद्योगांच्या गरजांनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जात आहे. उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ हवे आहे आणि तरुणांना रोजगार हवा आहे. या दोघांमध्ये प्रभावी दुवा निर्माण करण्याचे काम ‘महाचतुर चॅटबॉट' करणार आहे. एआय आधारित ‘चॅटबॉट’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार संधी, उद्योजकता मार्गदर्शन, अर्ज प्रक्रिया, असेसमेंट आणि मार्केट लिंकेज अशा सर्व सेवा वन-स्टॉप सोल्युशन म्हणून उपलब्ध करुन देणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या ‘चॅटबॅाट’ लोकार्पण व सामंजस्य करार पार पडले. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, राज्य नाविन्यता सोसायटीचे आयुक्त डॉ.अमित सैनी, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, जपानचे वाणिज्यदूत हितोमि साटो, जर्मनीचे वाणिज्य दूत क्रिस्टोफ हेलिअर, कोरियाचे वाणिज्य दूत यो डाँवॉन, फिनलँडचे वाणिज्य दूत इरिक एफ हॉलस्ट्रॉम यांची प्रमुख उपस्थिती होती.