क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - ८ ऑगस्ट २०२६

क्राइम रिपोर्ट -  शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - ८ ऑगस्ट २०२६

क्राइम रिपोर्ट -  शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - ८ ऑगस्ट २०२६

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 क्रेनमधून घसरलेला लोखंडी अॅंगल अंगावर पडून कामगाराचा मृत्यू, चाकणमधील कंपनीतील घटना

 हायड्रोलिक क्रेनद्वारे लोखंडी अँगल उचलुन खाली घेत असताना निष्काळजीपणामुळे तो लोखंडी अॅंगल खालून चालेलेल्या कामगाराच्या अंगावर पडून त्याचा मृत्यू झाला. हा अपघात आंबेठाण रोड-चाकण येथील एस. के. एस. फास्टनर्स लिमिटेड कंपनीत २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास घडला. या प्रकरणी क्रेन चालकाविरोधात शुक्रवारी (ता. ७) चाकण उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र मोहिते यांनी फिर्याद दिली आहे. क्रेन ऑपरेटरचे नाव दिलीपकुमार सिताराम चौधरी (वय ३२, रा. चाकण; मूळ गाव बिहार) असेआहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी हा एस. के.एस फास्टनर्स लिमिटेड कंपनीच्या शॉप फ्लोअर विभागात हायड्रोलिक क्रेनद्वारे काम करीत होता. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास तो ब्रिज क्रेनखालील लोखंडी अँगल उचलत असताना त्याने क्रेनला अचानक झटका दिल्याने त्या लोखंडी अँगलचा तोल जाऊन त्याचा धक्का बाजूच्या लोखंडी अँगलला लागला आणि लोखंडी अँगल खालून पायी जात असलेल्या अजय मदनलाल (वय २६, रा. झिजाईमळा, चाकण) याच्या अंगावर पडला. त्यामुळे अजयला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला.

या प्रकरणी क्रेन ऑपरेटर चौधरी याच्यावर शुक्रवारी (ता. ७)  चाकण उत्तर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 देशी दारूच्या दुकानात तरुणाला लोखंडी रॉडने मारले

देशी दारूच्या दुकानात थांबलेल्या तरुणाच्या डोक्यात विनाकारण लोखंडी रॉड मारून त्याला जखमी केल्याची घटना ६ ऑगस्टला यशवंतनगर-तळेगाव दाभाडे येथील वीरचक्र चौक परिसरात घडली. या प्रकरणी शुक्रवारी (ता. ७) आरोपीविरोधात तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत, मंगेश सोपान सांडभोर (वय ३६ वर्ष, तळेगाव दाभाडे तालका) पोलिसांत तक्रार दिली आहे. आरोपीचे नाव अभिजीत धर्माधिकारी (रा. तळेगाव दाभाडे) असे आहे.

दिनांक  ६ ऑगस्टला दुपारी साडेतीनच्या सुमारास फिर्यादी मंगेश हे देशी दारुच्या  दुकानात थांबले असताना आरोपीने कोणतेही कारण नसताना त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन त्यांना जखमी केले. आरोपीविरोधात शुक्रवारी (ता. ७) तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 बोअरची मोटार काढून नेल्याच्या वादातून कुटुंबाला मारहाण, चौघांवर गुन्हा

 बोअरची मोटार काढून नेल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून कुटुंबातील सदस्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, तसेच लाकडी बांबूने मारहाण केल्याची घटना म्हाळुंगे (ता. मुळशी) येथे ६ ऑगस्टला रात्री साडेआठच्या सुमारास  घडली. या प्रकरणी शु्क्रवारी (ता. ७) बावधन पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 या प्रकरणी राजश्री कुंदन रावत (वय ४२, रा. म्हाळुंगे) यांनी फिर्याद दिली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ६ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास उत्तम स्वीट होमसमोर घडली. आरोपी राहुल बाळू पवार (वय २७), रमेश बाळू पवार (वय २५), आस्लम शेख आणि सम्राट शिंदे (सर्व रा. म्हाळुंगे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोअरची मोटार काढून नेल्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपींनी फिर्यादी राजश्री, त्यांचे पती कुंदन व दोन मुलांना शिवीगाळ करून हाताने, लाथाबुक्क्यांनी व लाकडी बांबूने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यावेळी आरोपींपैकी एकाने हर्ष यांच्या डोक्यात, गालावर व उजव्या खांद्यावर लोखंडी वस्तूने मारून त्यांना जखमी केले. तसेच त्यांचा आयफोन मोबाईल फोडून नुकसान केले. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादींच्या नातेवाइकांनाही आरोपींनी मारहाण केली. 

आरोपींवर शुक्रवारी (ता. ७) बावधन पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३२४ (४), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत जखमी तरुणाचा मृत्यू

 भरधाव व निष्काळजीपणे ट्रक चालवून दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या २४ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना १ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास त्रिवेणीनगर चौकातील पोलिस चौकीसमोर घडली. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध शुक्रवारी (ता. ७) निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मरण पावलेल्या तरुणाचे नाव अभिजीत श्रीशेल कुंचबळ (वय २४) असे आहे. या प्रकरणी त्याचे भाऊ आकाश श्रीशेल कुंचबळ (वय २९) याने पोलिसांत तक्रार दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत हे दुचाकीवरून तळवडे येथून निगडीतील साईनाथनगर येथील घरी जात होते. त्यावेळी मागून आलेल्या ट्रकचालकाने भरधाव व निष्काळजीपणे ट्रक चालवून त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली.  धडकेमुळे अभिजीत दुचाकीसह रस्त्यावर पडले आणि ट्रकखाली आल्याने त्यांच्या पोटाला व बरगड्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्या पोटातील आतडे व बरगड्या तुटल्या आहेत. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शुक्रवारी (ता. ७) निगडी पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरोधात  भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६ (१), २८१, १२५ (ब), मोटार वाहन अधिनियमातील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 डी-मार्टमध्ये ७,४०३ रुपयांचा माल लपवून नेण्याचा प्रयत्न, वडील-मुलावर गुन्हा दाखल  

डी-मार्ट मॉलमध्ये खरेदी केलेल्या वस्तूंपेक्षा अधिक किमतीचा माल चोरण्यासाठी लपवून नेत असल्याचे आढळून आल्याने पिता-पुत्राविरुद्ध संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ६ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास चिंचवड येथील डी-मार्ट मॉलमध्ये घडली.

या प्रकरणी रवी भिकाजी खंडाळकर (वय ४३) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींची नावे सचिन वसंत वाघमारे (वय ४५) आणि त्यांचा मुलगा आयुष वाघमारे (वय १८ वर्षे ६ महिने) अशी आहेत.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खरेदीसाठी डी-मार्टमध्ये आले होते. त्यांनी खरेदी केलेल्या मालाव्यतिरिक्त सुमारे ७ हजार ४०३ रुपये किमतीचे नऊ डिओ परफ्युम, दोन जोड बूट, सहा जोड कपडे, दोन अंडरवेअर आणि एक पेन सेट चोरीच्या उद्देशाने घेऊन जात असल्याचे आढळून आले.

या प्रकरणी आरोपींवर संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. ७ भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 मावळात बेकायदा गॅस रिफिलिंग प्रकरणी ७ जणांना अटक

 घरगुती व व्यावसायिक सिंलिडरमधून बेकायदेशीररित्या गॅस रिफिलींग करुन विक्री करण्याच्या उद्देशाने अनेक गॅस सिलिंडर बाळगल्याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी सात जणांना अटक केली. वराळे (ता. मावळ) येथील कुणाल भारत गॅस एजन्सीच्या गोडाऊनसमोर शुक्रवारी (ता. ७) ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत १५ लाख ५२ हजार २०० रुपये किमतीचे गॅस सिलिंडर आणि एक मारुती सुझुकी टेम्पो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 या प्रकरणी सहायक पोलिस उपनिरीक्षक अनंत देवेंद्र रावण यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपींची नावे मदन भिकमसिंग ठाकर (वय ३५), देवेंद्र हरीओम ठाकूर (वय २६), सुनील प्रकाश इंगळे (वय ३०), सुनील मल्लिकार्जुन पुजारी (वय २८), सूरज उमाकांत मासाळे (वय २२), रमेश व्यंकट रेड्डी (वय ३९) आणि अशोक मेहराजराम कुमार अशी आहेत. आरोपींनी  घरगुती व व्यावसायिक सिंलिडरमधून बेकायदेशीररित्या गॅस रिफिलींग करुन विक्री करण्याच्या उद्देशाने अनेक गॅस सिलिंडर बाळगले होते. ज्वलनशील पदार्थ असल्याची तसेच परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, याची माहिती असतानाही आरोपींनी हे घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडर बाळगले. 

याप्रकरणी आरोपींवर तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील कलम २८७, २८८, ३(५) तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ मधील कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 म्हाळुंगेमध्ये तरुणाकडून मेफेड्रॉन व अफिम जप्त 

म्हाळुंगे परिसरात अंमली पदार्थविरोधी पथकाने एका तरुणाकडून मेफेड्रॉन, अफिमसह एकूण १ लाख २१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ६ ऑगस्टला 

करण्यात आली. तरुणाविरोधात शुक्रवारी (ता. ७) उत्तर म्हाळुंगे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अंमली पदार्थविरोधी पथकातील पोलिस शिपाई रणधीर रमेश माने यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीचे नाव रमेश मानाराम चौधरी (वय ३८, रा. द्वारका सिटी, म्हाळुंगे) असे आहे. आरोपीकडे विक्रीच्या उद्देशाने बेकायदा २५ हजार ७०० रुपये किमतीचे २.५७ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी), ४६ हजार रुपये किमतीचे ९२ ग्रॅम अफिम आणि ५० हजार रुपये किमतीचा मोबाइल असा मुद्देमाल आढळून आला. चौकशीत अफिम राजस्थानमधील एका इसमाने आणून दिले आणि मेफेड्रॉन एका महिलेकडून आणल्याचे आरोपीने सांगितले.  या प्रकरणी आरोपीविरोधात उत्तर म्हाळुंगे पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 विक्रीसाठी बेकायदेशीरित्या मेफेड्रॉन बाळगणाऱ्या चौघांना अटक

लोखो रुपयांचे मेफेड्रॉन बेकायदेशीररित्या विक्रीसाठी बाळगल्या प्रकरणी चौघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई ६ ऑगस्टला चिखलीतील हरगुडे वस्ती ते स्पाईन रोड परिसरात केली आहे. 

याबाबत संतोष बिभीषण सपकाळ (पोलिस शिपाई, अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा) यांनी फिर्याद नोंदवली. अटक आरोपींची नावे १) समशुद राजाबली शहा (वय २३ वर्षे, रा. हरगुडेवस्ती), २) साहबन मोहम्मद इलियास शहा (वय २१ वर्षे, रा. कुदळवाडी), ३) सोहेल कादिर शेख (वय २९ वर्षे, रा. पिंपळेगुरव) व अभिराज जोखूराम कोरी (वय ३३ वर्षे, रा. हरगुडेवस्ती, चिखली) अशी आहेत. 

 एमडी (मेफेड्रॉन) या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी वाहतूक करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ८ ग्रॅम ७३ मिलीग्रॅम एमडी, एक चारचाकी, एक दुचाकी, चार मोबाइल आणि ९२० रुपये रोख असा एकूण ७ लाख ३८ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हे मेफेड्रॉन ते विक्रीसाठी नेत होते.  पोलिसांनी आरोपींना अटक केली.  चौकशीदरम्यान हा एमडी अंमली पदार्थ हर्ष यादव याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे आरोपींनी सांगितले. या प्रकरणी आरोपींविरोधात चिखली पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories