मोहननगर येथील ईएसआय रुग्णालयात दंतोपचार आणि शस्त्रक्रिया विभागाचे उद्घाटन
पिंपरी, ता. ८ ऑगस्ट २०२६ - मोहननगर येथील राज्य कामगार विमा रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या दंतोपचार आणि शस्त्रक्रिया विभागाचे उद्घाटन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ७) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले. त्यानंतर विमा रुग्ण आणि नगरसेवक अरुणा लंगोटे यांच्या हस्ते रुग्णालयात फीत कापून दोन्ही विभागांचे लोकार्पण करण्यात आले.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा सुपे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी मोसलगी, अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. शारदा नारायण दुबे, विकृतीविज्ञान (पॅथोलॉजी) विभागप्रमुख डॉ. अश्विनी वाडदेकर, दंत चिकित्सक डॉ. तुषार मनतोडे, शस्त्रक्रिया विभागप्रमुख अपेक्षा शिंदे, शिंदेसेनेचे विभागप्रमुख उमेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते गणेश लंगोटे यांच्यासह परिचारिका, रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
नव्या विभागांमुळे राज्य कामगार विमा सोसायटीच्या लाभार्थी कामगारांसह कुटुंबीयांना आजारांवर दातांसाठीचे आवश्यक उपचार रुग्णालयातच उपलब्ध झाले आहेत. सामान्य शस्त्रक्रिया, स्त्रीरोग व प्रसूतीविषयक शस्त्रक्रिया, अस्थिरोग, नेत्ररोग, तसेच कान-नाक-घसा यांसारख्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध झाली आहे.