शहरात 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत 'भाजप'कडून विविध उपक्रमांचे आयोजन

शहरात 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत 'भाजप'कडून विविध उपक्रमांचे आयोजन

 शहरात 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत 'भाजप'कडून विविध उपक्रमांचे आयोजन

पिंपरी, ता. ८ ऑगस्ट २०२७ -  स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात ‘हर घर तिरंगा - तिरंगा यात्रा’ अभियान उत्साहात राबविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी सुरू केली आहे. शहरातील बूथ स्तरापर्यंत अभियान प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी भाजपची विशेष जिल्हा बैठक नुकतीच पार पडली. 

शहराध्यक्ष शत्रुघ्न  काटे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीचे आयोजन अभियानाचे जिल्हा संयोजक मोरेश्वर शेडगे यांनी केले.बैठकीला विधान परिषद आमदार उमा खापरे, माजी आमदार अश्विनी जगताप, पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, सरचिटणीस विकास डोळस यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मंडल अध्यक्ष, शक्तीकेंद्र प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत १० ते १३ ऑगस्टदरम्यान युवा मोर्चा आणि महिला मोर्चाच्या पुढाकाराने विधानसभा स्तरावर भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. यात्रेत प्रतिष्ठित नागरिक, सेवानिवृत्त सैनिक, सुरक्षा कर्मचारी, सामाजिक संस्था तसेच शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी होणार आहे. शहीद स्मारके, वीर सपूत आणि महापुरुषांच्या पुतळ्यांच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबवून अभिवादन करण्यात येईल. तसेच देशसेवेत शहीद झालेल्या पोलीस आणि सैनिकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे.

१३ ते १५ ऑगस्टदरम्यान बूथ स्तरावरील प्रत्येक घरावर कापडी तिरंगा फडकविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थी, युवक आणि युवतींचा यामध्ये सहभाग वाढवून देशाची एकता, अखंडता आणि देशभक्तीची भावना दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे. अभियानातील फोटो व रील्स ‘नमो ॲप’, ‘सरल पोर्टल’ आणि सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येणार आहेत.

१४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’निमित्त मौन मिरवणूक काढण्यात येणार असून फाळणीचे दुष्परिणाम भोगलेल्या कुटुंबीयांची भेट घेतली जाणार आहे. तसेच छायाचित्र प्रदर्शन, व्याख्यान आणि चर्चा सत्राचे आयोजन केले जाणार आहे. ९ ते १७ ऑगस्टदरम्यान शहरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून ‘हर घर तिरंगा’ अभियान साजरे केले जाणार आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories