मोशी कचरा डेपो पुन्हा सप्टेंबरमध्ये सुरु होणार, इतर प्रभागात वेस्ट टू एनर्जी प्रकल्पासाठी ४० जागा निश्चित

मोशी कचरा डेपो पुन्हा सप्टेंबरमध्ये सुरु होणार, इतर प्रभागात वेस्ट टू एनर्जी प्रकल्पासाठी ४० जागा निश्चित

 मोशी कचरा डेपो पुन्हा सप्टेंबरमध्ये सुरु होणार, इतर प्रभागात वेस्ट टू एनर्जी प्रकल्पासाठी ४० जागा निश्चित 

महापालिकेकडून दीर्घकालीन कचरा व्यवस्थापनाचे नियोजन सुरू,  आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची माहिती 

पिंपरी, ता. ८ ऑगस्ट २०२६ - मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर बंद असलेला 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्प सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार एक हजार मेट्रिक टन प्रकल्पाचे नियोजन केले आहे. बायोमायनिंगसाठी मुदतवाढ दिली असून, डोंगर पूर्णपणे नष्ट करण्याचे कडक उद्दिष्ट दिले आहे. 

प्रकल्प सुरू झाल्यानंतर दररोज सुमारे ७०० टन सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून वीज निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

दिनांक ८ जुलैला मोशी कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळून ९ कामगारांचा जीव गेला. त्यानंतर डेपो बंद आहे. त्यामुळे शहरात निर्माण होणारा कचरा संकलित करण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापनासाठी प्राधान्याने कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. मोशी कचरा डेपोतील धुराड्याची चिमणी बदलण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, सप्टेंबरच्या मध्यापर्यंत हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित होईल प्रकल्प सुरू झाल्यानंतर दररोज सुमारे ७०० टन सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून वीज निर्मिती केली जाणार आहे. 

मोशी डेपोतील जुन्या कचऱ्याचा डोंगर कमी करण्यासाठी बायोमायनिंग (Bio-mining) प्रक्रिया वेगाने राबविली जात आहे. सध्या दररोज सुमारे ५ हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. बायोमायनिंगच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याची कामे निर्धारित मुदतीत पूर्ण न झाल्याने त्यांची मुदत संपली होती. मात्र, महापालिकेने संबंधित ठेकेदाराला मुदतवाढ दिली असून, मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री वाढवून पावसाळ्यातही काम सुरू ठेवण्यात आले आहे. पुढील सहा महिन्यांत मोशी डेपोतील कचऱ्याचा डोंगर पूर्णपणे हटविण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत. हे काम १०० टक्के पूर्ण झाल्यानंतर डेपो परिसरातील सुमारे २५ एकर जागा मोकळी होणार आहे. या जागेचा भविष्यात कचरा व्यवस्थापनासाठी योग्य पद्धतीने वापर करण्याचे नियोजन महापालिकेकडून केले जात आहे.

मोशी कचरा डेपोमध्ये आता कचरा साठवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे भविष्यातील कचरा व्यवस्थापनाचा विचार करून शहरातील अन्य ठिकाणी १ हजार टन क्षमतेचा नवीन वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील १० क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत कचरा प्रक्रिया केंद्रांसाठी सुमारे ४० जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यापैकी कमी लोकवस्ती असलेल्या जागांची लवकरच स्थळपाहणी करण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवरच कचऱ्यावर प्रक्रिया केल्यास कचरा वाहतुकीवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच कचरा एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात साठवण्याची समस्या देखील कमी होईल.

सध्या पिंपरी-चिंचवड शहरात दररोज सुमारे १ हजार ५०० टन कचरा निर्माण होतो. शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील कचरा निर्मितीचा विचार करता हे प्रमाण पुढील काळात ५ हजार टनांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने आतापासूनच दीर्घकालीन कचरा व्यवस्थापनाचे नियोजन सुरू केले आहे.

कासारवाडीतील शंकरवाडी परिसरात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सुमारे ४० एकर जागेवर जुना कचरा डेपो आहे. त्यापैकी सुमारे २० एकर जागा कचरा प्रक्रिया केंद्रासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव संरक्षण विभागाकडे पाठवला जाणार आहे, अशी माहिती डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.  



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories