आई आणि मुलांची आत्महत्या, ताथवडे येथील घटना

आई आणि मुलांची आत्महत्या, ताथवडे येथील घटना

 आई आणि मुलांची आत्महत्या, ताथवडे येथील घटना 

पिंपरी, ता. २५ - ताथवडे येथे जेवणातून विष खाल्ल्याने आई, मुलगा व मुलीने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. २२ जून) घडली. आर्थिक अडचणीतून तिघांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कल्पना बिपिन सूर्यवंशी (वय ३५), सुभश्री (वय १७) आणि दादू (वय १०) अशी मृत आई व मुलांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना आणि त्यांची दोन मुले ताथवडे येथे भाड्याने घर घेऊन राहतात. त्यांचे सासर छत्रपती संभाजीनगर असून, माहेर यवतमाळ आहे. त्यांचे पती संभाजीनगरला राहतात. कल्पना यांच्या घराच्या खाली त्यांच्या बहिणीचे कुटुंब राहते. सोमवारी कल्पना आणि त्यांची मुले घराच्या बाहेर न दिसल्याने त्यांची बहीण कल्पना यांच्या घरी गेली. त्यांनी दरवाजा वाजविला. मात्र, आतून प्रतिसाद न मिळाल्याने बहिणीने आपल्या पतीला बोलावून घेतले. त्यांनी घराची खिडकी उघडली असता आत तिघेही झोपलेले दिसले. त्यांनी खिडकीतून त्यांच्या अंगावर पाणी फेकले. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

नागरिकांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता तिघेही मृतावस्थेत आढळले. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी तातडीने तिघांनाही वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कल्पना यांनी सकाळी इडली, सांबर केले होते. त्यात विष कालवून त्यांनी आणि मुलांनी खाल्ले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कल्पना यांनी एका बँकेतून घरासाठी कर्ज घेतले होते. मात्र, आर्थिक विवंचनेमुळे त्यांना कर्जाचे हप्ते भरता आले नाहीत. तीन-चार दिवसांपूर्वी बँकेने त्यांना घर लिलावात काढण्यासंदर्भात नोटीस पाठविली होती. त्यामुळे त्या खूप तणावात होत्या, असे नातेवाइकांनी सांगितले.

याबाबत, वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कलडक म्हणाले, ''ताथवडे येथील आई आणि दोन मुलांनी आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यू नेमका कसा झाला हे कळेल.''



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories