बारामती विमान अपघात प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलीस करणार
बंगळूर पोलिस ठाण्यात 'झिरो एफआयआर'द्वारे गुन्हा दाखल
पुणे, ता. २५ - दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी बंगळूर येथील पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २३) 'झिरो एफआयआर'द्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे.
२८ जानेवारीला मुंबईहून बारामतीकडे जाताना सकाळी पावणेनऊच्या सुमारास बारामती विमानतळापाशी हा अपघात झाला होता. त्यात अजितदादांसह, वैमानिक सुमित कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक, विदीप जाधव आणि पिंकी माळी यांचा होरपळून मृत्यू झाला. याप्रकरणी आमदार रोहित पवार यांनी कर्नाटकातील बंगळूर येथील 'हाय ग्राउंड्स' पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार आरोपींविरोधात सोमवारी (ता. २३) 'झिरो एफआयआर'द्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार देऊनही गुन्हा नोंदविण्यात आला नाही. त्यामुळे 'झिरो एफआयआर'द्वारे तक्रार नोंदवावी लागल्याचे फिर्यादी म्हटले आङे.
फिर्यादीत म्हटले आहे की, अजित पवार यांचा विमान अपघात हा अपघात नसून, नियोजित कटकारस्थानाचा भाग आहे. विमान कंपनीकडून सुरक्षा नियमांचे उल्लंघन, उड्डाण तासांच्या नोंदींमध्ये फेरफार, देखभालीतील गंभीर त्रुटी आणि संचालनातील निष्काळजीपणा यामुळेच दुर्घटना घडली.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) सुरक्षा अहवालानुसार संबंधित कंपनीची विमाने उड्डाणास अयोग्य ठरवून ग्राउंड केली होती. अपघाताच्या दिवशी बारामती परिसरात कमी दृश्यमानता असूनही विमानाला लँडिंगची परवानगी दिली. विमानाच्या प्रमाणपत्र प्रक्रियेतही विसंगती आढळली आहे. अपघातावेळी वैमानिक सुमीत कपूर यांचा मद्यप्राशनासंबंधीचा पूर्वइतिहास, शेवटच्या क्षणी वैमानिक बदल, उड्डाणातील विलंब आणि धोकादायक धावपट्टीची निवड या बाबीही संशयास्पद आहेत. पुणे 'सीआयडी'कडून केवळ अपघाती मृत्यूच्या दृष्टिकोनातून तपास सुरु आहे. त्यामुळे या घटनेचा स्वतंत्र फौजदारी तपास व्हावा, अशी मागणी फिर्यादीत केली आहे.
हे प्रकरण पुढील तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. 'एफआयआर'ची
प्रत पुणे ग्रामीण पोलिस ठाण्याकडे प्राप्त झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.