news
clock
आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा काही तासांत उलगडा, आरोपीला आळेफाटा येथून अटक

आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा काही तासांत उलगडा, आरोपीला आळेफाटा येथून अटक

आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा काही तासांत उलगडा, आरोपीला आळेफाटा येथून अटक

पिंपरी, ता. २ -  आळंदी परिसरात गुरुवारी (ता. २) सकाळी उघडकीस आलेल्या सहा वर्षीय चिमुकली आणि ७० वर्षीय वृद्धेच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने काही तासांतच अटक केली. आरोपी विनायक तुकाराम भवारी (वय ३१ वर्षे, व्यवसाय- सेंटरिंग रा. संगमनेर जि. अहिल्यानगर, मूळ रा. ता. जुन्नर)याला आळेफाटा येथून अटक करण्यात आली असून, संशयातून त्याने हे क्रूर कृत्य केल्याचे समोर आले आहे.


आळंदी परिसरात गुरुवारी सकाळी धनश्री केदारी (वय ६) आणि शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे (वय ७०) यांची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. धनश्रीची आई संगीता केदारी या गुरुवारी रात्री हॉस्पिटलमध्ये कामावर गेल्या होत्या, त्यामुळे धनश्री शेजारील मंगल शिंदे यांच्याकडे होती. रात्री उशिरा संगीता यांचा पती व धनश्रीचा नात्याने आजोबा असलेला आरोपी विनायक भवारी तेथे आला. मंगल शिंदे या पत्नीला आपल्याविरुद्ध भडकवतात, असा संशय आरोपीच्या मनात होता. याच रागातून त्याने प्रथम शिंदे यांचे डोके भिंतीवर आपटून त्यांची हत्या केली आणि त्यानंतर ओळख पटेल या भीतीने चिमुकल्या धनश्रीचा उशीने तोंड दाबून खून केला. 

घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट - ३ चे पोलीस निरीक्षक कसबे आणि उपनिरीक्षक भरत गोसावी यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढला. तो आळेफाटा येथे पळून गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. संगीता केदारी आणि आरोपी विनायक यांचा दोन वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून परिचय होऊन प्रेमविवाह झाला होता. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्यात वाद असल्याने तो वेगळा राहत होता.  आळंदी पोलीस अधिक तपास करत आहेत.

दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्याची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ३ संतोष कसबे, पोलिस उपनिरीक्षक भरत गोसावी, सुनिल जावळे, पोलीस अंमलदार सोनवणे, बोऱ्हाडे, भोसुरे, सुर्यवंशी, भांगले, राळे, दांगट, महाले, थोरात व वराडे तसेच तांत्रीक विश्लेषण शाखेकडील प्रकाश ननावरे यांनी केली आहे.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories