आकाशवाणी पुणे केंद्राचा वृत्त विभाग सुरु राहणार, नियोजित वेळेनुसार होणार बातम्यांचे प्रसारण
आकाशवाणी पुणे केंद्राचा वृ्त्त विभाग सुरु राहणार, नियोजित वेळेप्रमाणे बातम्यांचे होणार प्रसारण
पुणे, ता. १८ - आकाशवाणी पुणे केंद्राच्या वृत्त विभागातील अधिकारी सेवानिवृत्त झाल्यानंतर हा विभाग बंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. त्यावर, तातडीने पुणे श्रमिक पत्रकार संघाने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे मागणी केली होती. त्याबाबतचे निवेदनही देण्यात आले होते.
त्यावर नुकतीच पुण्यात केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत मोहोळ यांची बैठक झाली. त्यात वस्तूस्थिती समजून घेत वैष्णव यांनी हा वृत्त विभाग बंद होणार नाही. ठरलेल्या वेळेप्रमाणे बातम्यांचे प्रसारण सुरु राहील असे स्पष्ट केले आहे.
पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, उपाध्यक्ष सागर आव्हाड यांनी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांना निवेदन दिले होते. वृत्त विभागाचे ऐतिहासिक महत्त्व, पत्रकारितेतील योगदान आणि श्रोत्यांशी असलेले भावनिक नाते यामुळे आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरील बातम्या बंद करू नये. केंद्रात मोदी सरकारला १२ वर्ष पूर्ण झाल्याने आनंदोत्सव केला जात असताना याच वर्षी आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद करणे खेदजनक ठरेल असे या निवेदनात नमूद केले होते.
या निवेदनाची दखल घेत मंत्री मोहोळ यांनी आज (ता. १७) अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. "पुणे आकाशवाणी केंद्राला गौरवशाली इतिहास लाभला आहे. महाराष्ट्रातील कोट्यावधी श्रोते नियमितपणे बातम्या ऐकतात. त्यांच्या भावना केंद्रीय मंत्री वैष्णव यांच्यापर्यंत पोचविल्या आहेत. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आकाशवाणीचा वृत्त विभाग सुरूच राहील असे सांगितले असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
आकाशवाणीचे सर्व विभाग अध्यायावत केले जाणार -
"पुणे आकाशवाणीचे वृत्त विभाग बंद केला जाणार नाही. उलट आकाशवाणीचे सर्व विभाग अद्यायावत केले जाणार आहेत. जास्तीत जास्त स्थानिक बातम्या दिल्या गेल्या पाहिजेत यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे."
- अश्विनी वैष्णव, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री