हृदयविकाराचा झटका आलेल्या निवृत्त जवानाचा वाहतूक कोंडीमुळे रस्त्यातच मृत्यू, आळंदीतील घटना
हृदयविकाराचा झटका आलेल्या निवृत्त जवानाचा वाहतूक कोंडीमुळे रस्त्यातच मृत्यू, आळंदीतील घटना
पिंपरी, ता. २९ - निवृत्तीनंतर आळंदीत वास्तव्यास असलेल्या भारतीय सैन्य दलातील जवानाला हृहयविकाराचा झटका आला. घरापासून रुग्णालय जवळच होते. मात्र, त्यांना घेऊन चाललेली रुग्णवाहिका आणि रिक्षाही वाहतूक कोंडीत अडकली आणि या जवानाला आपल्या प्राणांना मुकावे लागले आहे. ही घटना आळंदीमध्ये रविवारी (ता. २७) घडली. भीमाजी तुकाराम चौरे (वय ५९) असे मृत जवानाचे नाव आहे.

भीमाजी तुकाराम चौरे (वय ५९) यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलात (सीआरपीएफ) तब्बल २२ वर्षे सेवा बजावली. निवृत्तीनंतर ते सहकुटुंब आळंदीत राहात होते. रविवारी (ता. २७) त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यासाठी कुटुंबियांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावली. रुग्णालय त्यांच्या घरापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावरच होते. मात्र, आळंदीतील पद्मावती रस्त्यावरील मंगल कार्यालयांतील वाहनांची भली मोठी गर्दी रस्त्यावर होती. त्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये ही रुग्णवाहिका अडकली. रुग्णवाहिकेला रस्ता मिळण्याची चिन्हे दिसेनात म्हणल्यावर चौरे यांना रिक्षात ठेवून रिक्षा निघाली. त्यांची पत्नी आणि मुलगी रस्ता मोकळा करण्यासाठी धावाधाव करु लागल्या. मात्र, स्वतःच्या विश्वात मश्गुल असलेल्या नागरीकांनी कोणतीही तत्परता दाखवली नाही आणि रुग्णालयात पोचण्यापूर्वीच चौरे यांचा जीव गेला. त्यांचे कुटुंब पोरके झाले.
भीमाजी चौरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. ही घटना वाचून ऐकून सोडून न देता आपण सर्वांनी सार्वजनिक जीवनात स्वयंशिस्त पाळण्याचा बोध घेतला पाहिजे. रस्त्यांवरुन वाहने चालवताना नियमांचे काटेकोर पालन प्रत्येकाने राखलेच पाहिजे. म्हणजे, कोणालाही रस्त्यात जीव गमावण्याची वेळ येणार नाही.