आर्थिक विवंचनेतून विषारी औषधाचा धूर घेत एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या
पिंपरी, ता. ३ ऑगस्ट २०२६ - आर्थिक विवंचनेतून विषारी औषधाचा धूर घेत कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची घटना मोरवाडी-पिंपरी येथे घडली आहे. कुटुंबातील तिघांपैकी पतीचा शनिवारी (ता. १) घरातच मृत्यू झाला. अत्यवस्थ असलेल्या आई व मुलीवर पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम) उपचार सुरू असताना रविवारी (ता. २) त्यांचा मृत्यू झाला. विनोद पिल्लई (वय ५०), त्यांची पत्नी सिरजा (वय ४५) आणि मुलगी पूर्णिमा (वय १९, सर्व रा. करिष्मा ग्लोरी सोसायटी, मोरवाडी, पिंपरी, मूळ- केरळ) अशी मृतांची नावे आहेत.
शुक्रवारी मध्यरात्री विषारी औषध पेटत्या कोळशावर टाकून त्याचा धूर घेतल्याने तिघेही घरात निपचित पडले. तिघांनाही 'वायसीएम' रुग्णालयात दाखल केले.
मात्र, विनोद यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर, सिरिजा आणि पूर्णिमा यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आत्महत्येपूर्वी विनोद यांनी 'सुसाइड नोट' लिहिली होती. त्यामध्ये आपण "आर्थिक कारणावरून आत्महत्या करत असून कोणालाही जबाबदार धरू नये," असे म्हटले आहे. हे औषध विनोद यांनी ऑनलाइन मागवल्याचे तपासात समोर आले आहे.
विनोद पिल्लई हे नोव्हेंबर २०२४ पर्यंत एका कंपनीत व्यवस्थापक होते. नोकरी गेल्याने ते घरीच असायचे. पिल्ले कुटुंबीय हे नेहरूनगरमध्ये राहत होते. मात्र, तीन वर्षांपूर्वी त्यांनी आर्थिक कारणावरून राहते घर विकले. त्यानंतर ते मोरवाडीत भाड्याच्या खोलीत राहत होते. तिघांचेही मृतदेह यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. पिल्ले यांचे नातेवाईक केरळमधील त्रिवेंद्रम येथून येणार आहेत. त्यानंतर नेहरूनगर येथील स्मशानभूमीत सोमवारी (ता. ३) तिन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.