क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - ३ ऑगस्ट २०२६
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 लघुशंकेच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, एक अटकेत
चिखली परिसरात लघुशंकेच्या किरकोळ कारणावरुन झालेल्या वादाचे पर्यवसान जीवघेण्या हल्ल्यात झाले. ही घटना शनिवारी (ता. १) सायंकाळी सुमारे ७ वाजता भोसले पेट्रोल पंपाजवळ, कान्हा-१५ बार अँड रेस्टॉरंटसमोर, पूर्णानगर, चिखली येथे घडली. या प्रकरणी रविवारी (ता. २) चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अभिषेक प्रकाश घनघाव (वय २६, रा. चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिषेक घनघाव हे मित्र सुप्रीम राजू काळे आणि साहिल भिसे यांच्यासह बारमधून घरी जात असताना सुप्रीम काळे आणि आरोपी यांच्यात लघुशंकेच्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या साथीदारांना घटनास्थळी बोलावले. फिर्यादी तेथून मोटारसायकलवर निघत असताना आरोपींनी त्यांना अडवून गाडीची चावी काढून घेत शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, घटनास्थळी आलेल्या साथीदारांपैकी एकाने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डाव्या मांडीवर वार केला. त्यानंतर दुसऱ्या आरोपीने त्याच रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर प्रहार करून त्यांना जखमी केले. फिर्यादी तेथून पळून जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. यावेळी फिर्यादीचा मित्र सुप्रीम काळे याला खाली पाडून त्याच्यावर दगड, लोखंडी रॉड, धारदार शस्त्र तसेच लाथाबुक्क्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
घटनास्थळी नागरिक जमा झाल्यानंतर आरोपींनी हातातील शस्त्रे दाखवत, "पुढे आलात तर एक-एकाला सोडणार नाही," अशी धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी आठ ते नऊ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच इतर कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपी आकाश कसबे याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांसह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 बेकायदा गॅस रिफिलिंग सेंटरवर कारवाई; सहा सिलिंडरसह एकावर गुन्हा दाखल
महिंद्रा कंपनीसमोर सुभाषवाडी, मौजे निघोजे येथे बेकायदा घरगुती गॅस रिफिलिंग करणाऱ्या एका व्यक्तीवर दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी शिवराज विश्वनाथ शिवपुजे (वय ४१, रा. मुळगाव मांजरी, ता. मुखेड, जि. नांदेड; सध्या रा. सुभाषवाडी, निघोजे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी फिर्याद दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार किशोर जनार्दन सांगळे यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा ओमकार गॅस रिपेरिंग सेंटर येथे कोणताही परवाना नसताना घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून लहान टाक्यांमध्ये धोकादायक पद्धतीने गॅस भरून देत होता. ही बाब माहिती असूनही त्याने ज्वलनशील पदार्थांचा साठा करून परिसरातील नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण केला. कारवाई दरम्यान पोलिसांना अंदाजे १५ किलो वजनाचे चार लाल रंगाचे गोगॅस कंपनीचे सिलिंडर तसेच दोन लहान गॅस सिलिंडर आढळून आले. हे सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.
आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८७, २८८ तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला नोटीस बजावण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक घुले व पोलिस उपनिरीक्षक करे करीत आहेत.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणावर सिमेंटच्या गट्टूने हल्ला, निगडीत तिघांविरोधात गुन्हा दाखल
मिरवणूक पाहून घरी जात असलेल्या एका तरुणावर धक्का लागल्याच्या कारणावरून सिमेंटच्या गट्टूने डोक्यात वार करून जखमी केल्याची घटना दळवीनगर कॉर्नर, जुना मुंबई-पुणे महामार्ग येथे घडली. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम सिताराम फडके (वय २१, रा. आनंदनगर वसाहत, चिंचवड स्टेशन परिसर) हे २ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मिरवणूक पाहून घरी जात होते. त्यावेळी दळवीनगर कॉर्नर येथे धक्का लागण्याच्या कारणावरून आरोपीने त्यांच्याशी वाद घातला.
वाद वाढल्यानंतर आरोपीने सिमेंटच्या गट्टूने फडके यांच्या कपाळावर व डोक्यात वार केले. तसेच आरोपीच्या दोन साथीदारांनी फडके यांना हाताने मारहाण करत शिवीगाळ केली. या हल्ल्यात फडके जखमी झाले.
या प्रकरणी निगडी-पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५२, ३(५) तसेच भारतीय दंड विधान कलम ३२४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 पिंपळे गुरवमध्ये तरुणावर चाकूने हल्ला, चौघांविरोधात गुन्हा दाखल
रस्त्यात उभे राहण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत एक आरोपीला अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी राम बंडू आरड (वय १८, रा. वैदूवस्ती, पिंपळे गुरव) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋषी माने, प्रणव इरकल, आदित्य शिंदे आणि नागेश चव्हाण (सर्व रा. वैदूवस्ती, पिंपळे गुरव) यांच्यावर भारतीय न्याय संहिता तसेच भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. २) फिर्यादी दुचाकीवरून कामावर जात असताना पिंपळे गुरव येथील तालमीजवळ आरोपी ऋषी माने रस्त्याच्या मध्ये उभा होता. त्याला बाजूला होण्यास सांगितल्यावर त्याने फिर्यादीला शिवीगाळ करत वाद घातला. धमकी देऊन तो तेथून निघून गेला.
काही वेळाने ऋषी माने, प्रणव इरकल, आदित्य शिंदे आणि नागेश चव्हाण हे दोन दुचाकींवरून तेथे आले. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी ऋषी माने याने आणलेल्या चाकूने वार केल्याने फिर्यादीच्या डाव्या खांद्यावर व गळ्याखाली गंभीर दुखापत झाली. दरम्यान, आरोपी प्रणव इरकल याने कमरेला खोचलेला कोयता काढला असता फिर्यादीचा मित्र लक्ष्मण लोखंडे याने त्याला मागे ओढल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक पाटील करीत आहेत.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू, तरुणी गंभीर जखमी
पुणे-नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी (ता. खेड) येथे आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत ८२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर २४ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी (ता. २ ऑगस्ट) सकाळी सहाच्या सुमारास प्रेमाचा चहा हॉटेलसमोर घडली.
या प्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चालक इस्माईल रमजान अली (वय २३, रा. करोदिया चौपाटी, बंजारी, इंदूर, मध्य प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याकडून चाकणच्या दिशेने जाणारा आयशर ट्रक (क्र. एमएच ०९ डीएफ ३२३७) आरोपी चालक चालवत होता. नानेकरवाडी येथील प्रेमाचा चहा हॉटेलसमोर रस्ता ओलांडणाऱ्या शांताबाई गंगाधर पांचाळ (वय ८२, रा. बालाजीनगर, मेदनकरवाडी, ता. खेड) आणि राजश्री अशोक पांचाळ (वय २४, रा. बालाजीनगर, मेदनकरवाडी, मूळ गाव जावळूर, ता. मुखेड, जि. नांदेड) यांना ट्रकने धडक दिली.
या अपघातात शांताबाई पांचाळ यांचा मृत्यू झाला, तर राजश्री पांचाळ गंभीर जखमी झाल्या. ट्रक चालकाने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवल्याने हा अपघात झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याबाबत रामचंद्र गणपती पांचाळ (वय ४३, रा. बालाजीनगर, मेदनकरवाडी) यांनी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६, १२५ (अ), १२५ (ए) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 कासारसाई येथे घरासमोरून दुचाकी चोरी
कासारसाई (ता. मुळशी) येथे घरासमोर उभी केलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आनंद सोमनाथ करडे (वय ३०, व्यवसाय- चालक, रा. कासारसाई, ता. मुळशी) हे विनायक टेमगिरे यांच्या खोलीत भाड्याने राहतात. त्यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर ही मोटारसायकल २८ जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास खोलीसमोर उभी केली होती.
२९ जुलै रोजी सकाळी सहाच्या दरम्यान पाहणी केली असता मोटारसायकल आढळून आली नाही. अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय व आर्थिक फायद्याच्या उद्देशाने मोटारसायकल चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी २ ऑगस्ट हिंजवडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------