वाकड येथील आनंद जेष्ठ नागरिक संघाची वार्षिक सभा उत्साहात
पिंपरी, ता. १ जुलै २०२६ - पोस्टल कॉलनी-वाकड येथील आनंद ज्येष्ठ नागरिक संघाची 13 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. 28) पार पडली. सर्वांच्या भेटीगाठी, मनमोकळा संवाद यामुळे ही सभा स्नेहमळाव्यासारखीच झाली.
हॉटेल बर्ड व्हॅलीच्या सभागृहात झालेल्या या सभेला 230 ते 240 सभासद उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका स्वाती कलाटे, पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ यांची प्रमुख उपस्थिती होती. संघाचे अध्यक्ष भागवत कोल्हे यांनी आलेल्या सर्वांचे स्वागत केले. संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कला मंच मधील महिलानी गणेश वंदन शारदा स्तवन व स्वागत गीत सादर केले. वय वर्ष 75 असणाऱ्या सभासदांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले. स्वाती कलाटे म्हणाल्या, "आनंद ज्येष्ठ नागरिक संघाची वाटचाल खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. अनेक प्रकारचे उपक्रम होतात. या संघामध्ये महिलांची संख्या जास्त आहे. महिलांचे अनेक कार्यक्रम घेतले जातात. यांच्या यशस्वी वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा. वृषाली मरळ यांनी संघाला विरंगुळा केंद्र मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करीन, असे सांगितले.
वय वर्ष 75 असणाऱ्या मुरलीधर लहाने, श्रीकांत रेवणवार, मनोहर चौधरी ,भास्कर आगलावे, शिवाजी सिद्धांति, निवृत्ती पाटील, अरुण काळे, शशिकला पेडणेकर, शालिनी नारखेडे, मंजू पटवर्धन, पारूबाई पवार, देवयानी जोशी व मीरा बोरकर यांचा सन्मान करण्यात आला. योगगुरु ज्ञानेश्वर गिरमे, रेखा गिरमे, माधव बराटे यांनाही गौरवण्यात आले. आंतरराष्ट्रीय खुराश इन्स्टिट्यूट मध्ये तज्ज्ञ म्हणून निवड झालेले डॉ. संतोष तेली, युरोपियन पातळीवर जुडोमध्ये ब्रॉंझ पदक मिळवणाऱ्या शिल्पा तेली आणि त्वचारोग तज्ज्ञ डॉ. नंदिनी तेली यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. संघाचे उपाध्यक्ष मुरलीधर लहाने, संघाचे सचिव सुरेश बोरकर, सहसचिव आप्पासाहेब तेली व खजिनदार माधव बराटे यांनी संयोजन केले. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गिरमे यांनी केले.