''पीएमपी'च्या बसमध्ये राहिलेले महिलेचे पाकीट चालक-वाहकाच्या प्रामाणिकपणामुळे मिळाले परत......
'पीएमपी'च्या बसमध्ये राहिलेले महिलेचे पाकीट चालक-वाहकाच्या प्रामाणिकपणामुळे मिळाले परत......
पुणे, ता. ३० - पुणे महानगर परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास करताना एका महिलेचे पाकीट बसमध्येच राहिले आणि बस चालक व वाहक यांच्या प्रमाणिकपणामुळे पाकीट रक्कमेसहित परतही मिळाले. या सेवेबद्दल पीएमपीच्या चालक-वाहकाचे, सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुक.
प्रवासी सुनिता नेताजी यावे (रा. वारजे, गणपती माथा) या PMPML बसने कर्वे पुतळा येथून गणपती माथा येथे प्रवास करत होत्या. त्यांनी नियमितपणे तिकीट काढून बसमध्ये आपल्या जागेवर बसून प्रवास केला. गणपती माथा येथे बस थांबल्यानंतर त्या उतरून घरी गेल्या. घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, त्यांचे एक छोटे पाकीट बसमध्येच राहिले आहे.
त्या पाकिटामध्ये रुपये ८,७०० रोख रक्कम (₹५०० च्या १७ नोटा व ₹१०० च्या २ नोटा) तसेच घराच्या कुलपाची चावी होती. हे लक्षात येताच त्या घाबरुन गणपती माथा स्थानकात आल्या. त्यांनी रडत रडत सर्व प्रकार तेथील स्टार्टर हरिश्चंद्र तांदळे यांना सांगितला.
सुनिता ताईंकडे प्रवासाचे तिकीट होते. तांदळे यांनी सर्वप्रथम त्यांच्याकडील तिकीट तपासले. तिकीट क्रमांक 144/3 असल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ एनडीए गेट क्रमांक १० येथील स्टार्टर राजाभाऊ ओव्हाळ यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली.
दरम्यान, संबंधित बस एनडीए गेट क्रमांक १० येथे पोहोचली. राजाभाऊ ओव्हाळ यांनी बसचे चालक गणेश कदम यांना पाकिटाबाबत विचारणा केली. त्यावर चालकांनी सांगितले की, बसमध्ये एक पाकीट सापडले असून ते त्यांनी सुरक्षिततेसाठी वाहक गणेश बारवकर यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
त्यानंतर वाहक गणेश बारवकर यांनी ते पाकीट ओव्हाळ यांच्या स्वाधीन केले. पाकिटातील रक्कम मोजून पाहिल्यानंतर त्यामध्ये रुपये ८,७०० रोख रक्कम व घराची चावी सुरक्षित असल्याची खात्री झाली.
यानंतर, राजाभाऊ ओव्हाळ यांनी तत्काळ गणपती माथा येथील स्टार्टर हरिश्चंद्र तांदळे यांना फोन करून महिला प्रवाशांना धीर देण्यास सांगितले. त्यांनी संदेश दिला की, "काळजी करू नका, तुमचे पाकीट व त्यातील सर्व रक्कम सुरक्षित आहे. संबंधित बस १५ मिनिटांत गणपती माथा येथे येईल आणि तुम्हाला तुमचे पाकीट परत मिळेल."
काही वेळातच बस गणपती माथा येथे पोहोचली. चालक गणेश कदम, वाहक गणेश बारवकर आणि स्टार्टर हरिश्चंद्र तांदळे यांच्या उपस्थितीत महिला प्रवाशांना त्यांचे पाकीट, ₹८,७०० रोख रक्कम व घराची चावी सुखरूप परत करण्यात आली.
पाकीट परत मिळाल्यानंतर सुनिताताई आनंदून गेल्या. त्या म्हणाल्या, "जर हे पाकीट इतर कोणाच्या हाती पडले असते, तर मला ते कदाचित पुन्हा मिळाले नसते. पण PMPMLच्या प्रामाणिक चालक, वाहक आणि स्टार्टर अधिकाऱ्यांमुळे माझी सर्व रक्कम सुरक्षित परत मिळाली. मी सर्व कर्मचाऱ्यांची मनःपूर्वक आभारी आहे. आपले खूप खूप धन्यवाद!"