भोंदू अशोक खरात प्रकरणी मुंबईतील उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे-पाटील यांची मंत्रालयात बदली
पुणे, ता. २५ - भोंदू अशोक खरातची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी सुरु आहे. या प्रकरणात 'एसआयटी'ने चौकशीचा मोर्चा आता प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे वळवला आहे. या प्रकरणात खरात सोबत जमिनीत भागिदारी असल्याच्या कारणावरुन मुंबईत उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अभिजीत भांडे-पाटील यांची प्रतिनियुक्ती तत्काळ संपुष्टात आणून त्यांची मंत्रालयात बदली करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
अभिजीत भांडे पाटील यांच्या आणि अशोक खरातच्या पत्नी व मुलीच्या नावे नाशिकच्या पाथर्डी शिवारातील ४० गुंठे जमिनीचा संयुक्त सातबारा नोंदवला गेला आहे. या जमिनीमध्ये आर्थिक गुंतवणूक आणि भागीदारीचे आरोप आहेत. अशोक खरातशी संबंधित इतर कामांमध्येही भांडे-पाटील यांचा संबंध असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या कारवाईनंतर खरातशी संबंधित इतर अधिकारी आता टेन्शनमध्ये आले आहेत.
या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्या खरातशी संबंधित एका ट्रस्टच्या संचालिका होत्या. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात कोणालाही सोडणार नसल्याचा इशारा दिला असून, सर्व संबंधितांची सखोल चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील पहिली प्रमुख शासकीय अधिकाऱ्याविरुद्धची कारवाई मानली जात आहे.