भोंदू अशोक खरातला मंगळवारी दुपारी कोर्टात हजर करणार
पुणे, ता. २४ - भोंदू अशोक खरात याची पोलीस कोठडीची मुदत आज, मंगळवारी (ता. २४) संपत आहे. खरातला दुपारी नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यावेळी त्याला न्यायालयीन कोठडी द्यायची की पुन्हा पोलीस कोठडी वाढवायची, याचा निर्णय न्यायालय घेईल.
विशेष तपास पथक (SIT) खरातची बारकाईने चौकशी करत असून त्याचे काळीकृत्ये समोर येत आहेत. तपासात खरातचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. अशोक खरातने 'तुर्की मध' किंवा 'एल्व्हिश मध' या नावाने एक पदार्थ लाखो रुपयांना विकला आहे. हा मध तुर्कीतील समुद्रकिनाऱ्याच्या गुहांमधून मिळतो, शरीरातील अशक्तपणा, लैंगिक दुर्बलता दूर करतो आणि अमर्याद ऊर्जा देतो, असे खरात सांगायचा.
एक किलो मधासाठी ९ लाख रुपये किंमत आकारली होती. नामांकित व्यावसायिक, राजकीय व्यक्ती आणि उच्चभ्रू वर्गातील अनेकजण या फसवणुकीला बळी पडले. या रॅकेटने कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याचा संशय आहे. फसवणुकीची रक्कम थेट खरातकडे न ठेवता, त्याच्या ट्रस्टच्या खात्यात जमा केली जाई, ज्यामुळे मनी लॉन्डरिंगचा भाग असल्याचे पोलिसांना आढळले आहे.
राजकीय, व्यावसायिक आणि इतर सहकाऱ्यांच्या संबंधांचा पोलिस सखोल तपास करत आहेत. अनेक नेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटींचे खरातशी संबंध असल्याचे फोटो आणि माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिडीतांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे आणि निष्पक्ष तपासाचे आश्वासन दिले आहे.