पादचारी पुलाच्या कामासाठी पुलावरील वाहतूक आजपासून 6 जुलैपर्यंत बंद
पुणे, ता. २२ - महामेट्रोतर्फे डेक्कन मेट्रो स्टेशनला जोडणाऱ्या पादचारी केबल पुलाच्या कामासाठी बाबा भिडे पुलावरील वाहतूक आज सोमवारपासून (ता. २२) पूर्णतः म्हणजे दिवसा व रात्री बंद करण्यात येत आहे.
सात जुलैपासून पुढील आदेशापर्यंत पूल दिवसा वाहतुकीसाठी खुला असेल. मात्र, रात्री ११ ते सकाळी सहा या वेळेत तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येईल.
गैरसोय टाळण्यासाठी वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग असे -
१. भिडे पूल मार्गे डेक्कनकडे ये-जा करणारी वाहतूक :
लोकमान्य टिळक चौक ते खंडोजी बाबा चौकमार्गे इच्छित स्थळी जाता येईल. नदीपात्र रस्ता जयंतराव टिळक पूल -गंधर्व हॉटेल चौक आणि डेक्कन मार्गे प्रवास करावा. केळकर रस्ता ओंकारेश्वर पूल आणि झाशीराणी चौक मार्गाचा वापर करावा.
२. मेंहदळे गॅरेज चौक, डी.पी. रस्ता, कर्वे रस्ता आणि कोथरूडकडे जाणारी वाहतूक :
लोकमान्य टिळक चौक - लालबहादूर शास्त्री रस्त्याने गांजवे चौक आणि एस. एम. जोशी पूल मार्गे मार्गस्थ व्हावे. पूना हॉस्पिटल जवळील 'झेड ब्रिज'वरून केवळ दुचाकी वाहनांना ये-जा करता येईल.
३. डेक्कन पी.एम.टी. बस स्टॉप मार्गे केळकर रस्ता, नारायण पेठेकडे येणारी वाहतूक :
या मार्गावरील वाहनांनी लोकमान्य टिळक चौक आणि खंडोजी बाबा चौक मार्गे जावे.