कुदळवाडी-चिखलीतील अवैध भंगार गोदामांना आज पहाटे भीषण आग
पिंपरी, ता. २३ - कुदळवाडी, चिखली परिसरातील श्री महादेव मंदिराजवळ प्लास्टिक, रबर, लाकूड व इतर ज्वलनशील साहित्य साठवलेल्या अवैध भंगार गोदामांना आज मंगळवारी (ता. 23) पहाटे 4.20 च्या सुमारास भीषण आग लागली. सदर आगीची तीव्रता व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या चिखली, तळवडे, मोशी, भोसरी, पिंपरी, नेहरूनगर, प्राधिकरण व थेरगाव येथील अग्निशमन केंद्रांची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. सुमारे दोन ते अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर प्राथमिक नियंत्रण मिळविण्यात आले.
सदर अग्निशमन कार्यवाही दरम्यान अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांनी सर्व अग्निशमन जवानांच्या सहकार्याने योग्य नियोजन, समन्वय व कौशल्यपूर्ण कार्यवाही करत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले. आगीचे स्वरूप अत्यंत तीव्र असल्याने अग्निशमन वाहनांना वारंवार चिखली व टाटा मोटर्स येथील पंपिंग स्टेशनवरून पाणी भरण्याची कार्यवाही करावी लागली. सदर भंगार गोदामे एकमेकांना लागून असल्याने तसेच परिसरातील रस्ते निमुळते, वळणावळणाचे व अरुंद गल्लीबोळ स्वरूपाचे असल्यामुळे अग्निशमन वाहनांना थेट घटनास्थळापर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे सुरक्षित अंतरावरून फायर होज लाईन टाकून आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले.
परिसरालगत निवासी घरे असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने अन्यत्र हलवण्यात आले. तसेच स्थानिक नागरिकांच्या घरांना व मालमत्तेला आगीची झळ पोहोचू नये यासाठी त्यांच्या दिशेने पाण्याचे फवारे मारून संरक्षणात्मक कार्यवाही करण्यात आली. रात्रीच्या वेळेमुळे ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायर स्पष्टपणे दिसत नसल्याने अग्निशमन कर्मचारी व वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्युत अपघात टाळण्यासाठी संबंधित परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. ही आग पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
सुमारे दोन ते अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर प्राथमिक नियंत्रण मिळविण्यात आले. सदर अग्निशमन मोहिमेमध्ये एकूण 60 अग्निशामक कर्मचारी जवान व 01 अग्निशमन केंद्र अधिकारी यांनी सुरक्षितपणे व समन्वयाने कार्यवाही पार पाडली. अद्याप संबंधित गोदाम मालक घटनास्थळी उपस्थित नसल्यामुळे आगीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीचा अंदाज उपलब्ध झालेला नाही. तसेच आगीचे मूळ कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.