मंत्रिमंडळाच्या बैठकांना यापुढे मंत्र्यांसोबत केवळ एकाच अधिकृत व्यक्तीला मंत्रालयात प्रवेश दिला जाणार
मंत्रिमंडळाच्या बैठकांना यापुढे मंत्र्यांसोबत केवळ एकाच अधिकृत व्यक्तीला मंत्रालयात प्रवेश दिला जाणार
पुणे, ता. २० - मंत्रिमंडळाच्या बैठकांना मंत्र्यांच्या कार्यालयातून मंत्र्यांसोबत केवळ एकाच अधिकृत व्यक्तीला मंत्रालयात प्रवेश दिला जाणार आहे. याबाबतच्या सूचना मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जारी केल्या आहेत. मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजाची गोपनीयता जपण्यासाठी आणि परिसरातील वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकांना कार्यकर्ते, राजकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील समर्थकांची मोठी गर्दी जमते. त्यामुळे, मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजाची गोपनीयता राहात नाही. नवीन नियमानुसार, मंत्र्यांसोबत एकापेक्षा जास्त व्यक्तींची आवश्यकता भासल्यास, मुख्यमंत्री कार्यालयाकडून पूर्व लेखी परवानगी घेणे अनिवार्य असेल. हे परवानगी पत्र सुरक्षा अधिकाऱ्यांना आणि संबंधित विभागाच्या सचिवांना दाखवणे बंधनकारक असणार आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दोन तास आधी आणि दोन तास नंतर मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर किंवा कॅबिनेट हॉलच्या परिसरात इतर कोणत्याही बैठका होणार नाहीत. मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री स्टेट गेस्ट हाऊसमध्ये झाल्यास प्रतीक्षा कक्षात फक्त विद्यमान खासदार आणि आमदारांनाच थांबण्याची परवानगी दिली जाईल. त्यांचे वैयक्तिक सहाय्यक किंवा इतर कर्मचाऱ्यांना बैठकीच्या ठिकाणी जाण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे नवीन नियमांमध्ये सांगितले आहे.