चिखलीत भाड्याने नेलेली कार परत न केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल
पिंपरी, ता. २४ - भाड्याने कार घेऊन ती परत न केल्याप्रकरणी २५ वर्षीय युवकाविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळवडे रोड-चिखली येथील फिर्यादीच्या मालकीच्या जान्हवी मेडीकल दुकानासमोरुन ९ मार्च २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ही गाडी आरोपीने नेली होती.
सुरज सुभाष वायकर (वय २५, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी फिर्याद दिली आहे. वायकर यांचे तळवडे रोड-चिखली येथे जान्हवी मेडिकल दुकान असून त्यांच्या मालकीची सुमारे ३ लाख रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची हुंदाई कंपनीची वेन्यू (MH-14 JM-8926) ही कार आरोपी सवाई भिका राम (वय २५, सध्या रा. कात्रज, पुणे; मूळ रा. राजस्थान) याने विश्वास संपादन करुन भाड्याने घेण्याच्या बहाण्याने नेली. मात्र, संबंधित आरोपीने ही कार परत न केल्याने फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१६ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा २३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७.०७ वाजता नोंदविण्यात आला.
पुढील तपास पोलीस हवालदार व्होनमाने (बकल नं. १२५४) करीत आहेत.