दापोडीत १५ वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला, चौघांविरोधात गुन्हा दाखल
पिंपरी, ता. २४ - दापोडी परिसरात ईद निमित्त लावलेल्या स्पीकर पाहण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलावर जुन्या वादातून लोखंडी कोयत्याने वार केल्याची घटना शनिवारी (ता. २१) घडली आहे. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी दापोडी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौहीद तस्दीक अली खान (वय १५, रा. दर्गा वसाहत, खडकी) हा आपल्या नातेवाईकांसह २१ मार्च २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पवार वस्ती, दापोडी येथे गेला होता. तेथे ईदनिमित्त लावलेल्या स्पीकर पाहण्यासाठी तो गेला असता आरोपी सुफियान नौशाद अन्सारी व आझम खान यांनी त्याला बोलावले. यानंतर जुन्या भांडणाच्या कारणावरुन आरोपी शिफ्टेन खान, आझम खान, सुफियान अन्सारी व उमर (पूर्ण नाव अज्ञात) यांनी त्याच्यावर हल्ला केला.
आरोपींनी लोखंडी कड्याने कपाळावर तसेच लोखंडी कोयत्याने डोक्याच्या मागील बाजूस वार करून फिर्यादीस गंभीर जखमी केले. या घटनेनंतर जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५), आर्म अॅक्ट कलम ४(२५), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३ व ७ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा सोमवारी (ता. २३) मध्यरात्री नोंदविण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवळे करीत आहेत. आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.