जुन्या कौटुंबिक वादातून रिक्षाचालकाला जबर मारहाण, चिंचोली-देहूरोडमधील घटना
पिंपरी, ता. २२ - जुन्या कौटुंबिक वादातून रिक्षाचालकाला लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांडक्याने तसेच कुदळीने हल्ला करून जखमी केल्याची घटना देहूरोड परिसरातील चिंचोली येथे शनिवारी (ता. २०) घडली आहे. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप अटकेत नाहीत.
याबाबत, मारहाण झालेले रिक्षाचालक प्रदिप भिमराव गायकवाड (वय ४६ वर्षे, रा. चिंचोली, देहूरोड) यांनी पोलिसांत तक्रार दिली. रोपींमध्ये प्रेम ऊर्फ सनी चोपडे (वय २७), प्रणव मिलिंद चोपडे (वय २२), अनुराधा सूर्यकांत चोपडे (वय २१) आणि अक्षय अनिल चोपडे यांचा समावेश आहे.
शनिवारी (ता. २०) रात्री ११.३० ते ११.४५ वाजण्याच्या सुमारास ही मारहाण झाली. सुमारे एक महिन्यापूर्वी फिर्यादी यांनी त्यांच्या जागेची साफसफाई केल्यानंतर त्यांच्यात व आरोपींमध्ये वाद झाला होता. मात्र, आरोपी व फिर्यादी नातेवाईक असल्याने त्यावेळी तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. याच जुन्या वादातून आरोपींनी फिर्यादी गायकवाड यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांडक्याने तसेच कुदळीने मारहाण करून गंभीर जखमी केले. आरोपींना अटक केलेली नाही.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ११८ (२), ११५ (२), ३५२, ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.