उत्तर महाळुंगे पोलिस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना पिस्तूल (गावठी कट्टा) बाळगल्या प्रकरणी एकाला अटक
उत्तर महाळुंगे पोलिस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना पिस्तूल (गावठी कट्टा) बाळगल्या प्रकरणी एकाला अटक
पिंपरी, ता. २३ - उत्तर महाळुंगे एमआयडीसी परिसरातील भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी बेकायदेशीरपणे गावठी कट्टे बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट-४ पथकाने पकडले असून, या कारवाईत दोन देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई २२ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.४५ वाजता भामचंद्र शाळेच्या पाठीमागील रस्त्यावर करण्यात आली. त्याच दिवशी रात्री १०.४१ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला.
गुन्हे शाखा युनिट-४ मधील पोलीस शिपाई अमोल श्रीकांत वेताळ (पो.शि. २१०८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात कमलाकर राजेंद्र साळवे (वय २०, सध्या रा. घाटे वस्ती, आंबेठाण, ता. खेड; मूळ रा. पिंपळगाव खांड, ता. आकोले, जि. अहिल्यानगर) याला अटक करण्यात आली असून, एक अल्पवयीन गुन्हेगारही या गुन्ह्यात सामील आहे.
कारवाईदरम्यान आरोपींच्या ताब्यातून एकूण ८०,००० रुपये किमतीचे दोन देशी बनावटीचे गावठी कट्टे जप्त करण्यात आले आहेत.
तपासात आरोपींनी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे प्रतिबंधात्मक आदेश न पाळता, महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) अंतर्गत घालण्यात आलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याचेही निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.