क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - २ जुलै

क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - २ जुलै

क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - २ जुलै 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कौटुंबिक विसंवादातून काकाने केला पुतण्याचा खून, काळेवाडीतील घटना 

पिंपरी, ता. २ जुलै २०२६ -  काळेवाडी परिसरात घराच्या वाटणीच्या वादातून चुलत्याने पुतण्याचा लोखंडी रॉडने डोक्यात वार करून खून केला आहे. ही गंभीर घटना  बुधवारी (ता. १) जीवन चौक-काळेवाडी येथील कृष्णा गार्डन सोसायटीमध्ये घडली. काळेवाडी पोलिसांनी आरोपी चुलत्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी रोशन ऊर्फ मयुर राजेंद्र पाखरे (वय २९, रा. पाचपीर चौकाजवळ, काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १ जुलैला जीवन चौक-काळेवाडी येथील कृष्णा गार्डन सोसायटीमधील सी विंगमध्ये हा खून झाला आहे. आरोपी काका संजय उमाजी पाखरे (वय ६२, रा. कृष्णा गार्डन सोसायटी, काळेवाडी) यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपी संजय पाखरे व त्यांचे पुतणे यांच्यात घराच्या वाटणीचा वाद होता. तसेच संजय पाखरे यांना पुतण्या गणेश राजेंद्र पाखरे (वय ३२) याला लागलेल्या नोकरीबाबतचा राग होता. पत्नी व मुले आपल्याला सोडून जाण्यास पुतण्याचे कुटुंबालाच कारणीभूत असल्याचा संशय आरोपी काकाच्या मनात होता. या रागातून आरोपीने गणेशच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन त्याला ठार मारले. 

या प्रकरणी आरोपी काका संजय पाखरे यांच्यावर काळेवाडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कर्जाची परतफेड करूनही महिलेचे अपहरण; मारहाण करून दोन दिवस खोलीत डांबले

पिंपरी, ता. २ जुलै २०२६ - कर्जाची परतफेड करूनही आणखी पैसे देण्याची मागणी करत एका ५५ वर्षीय महिलेचे अपहरण करून तिला मारहाण करत तब्बल दोन दिवस एका खोलीत डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दिघी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा नागोराव आबाळे (वय ५५, रा. चौधरी पार्क, परांडे होम्स, लाईन नं. १, दिघी, मूळ रा. मांडवा, ता. पुसद, जि. यवतमाळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून मालिता रोहिदास राठोड, रोहिदास प्रेम राठोड (दोघे रा. घोटा, जि. वाशीम) आणि अनिल चव्हाण (रा. केम, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मालिता राठोड आणि रोहिदास राठोड यांना पोलिसांनी अटक केली असून तिसरा आरोपी फरार आहे.

ही घटना २९ जून रोजी सकाळी ११.३० ते १ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घडली. फिर्यादी यांनी घेतलेल्या पैशांची परतफेड करूनही आणखी पैसे येणे बाकी असल्याचे सांगत आरोपींनी त्यांना राहत्या घरातून जबरदस्तीने एमएच ४२ एएस ७७४२ क्रमांकाच्या कारमध्ये बसवले. त्यानंतर शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करून आरोपी अनिल चव्हाण यांच्या घरी नेऊन एका खोलीत डांबून ठेवले.

दरम्यान, फिर्यादींचा मुलगा तुकाराम आबाळे यांनी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्याचे समजताच आरोपी घाबरले आणि फिर्यादींना दिघी पोलीस ठाण्यात घेऊन आले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  भोसरी एमआयडीसीत कंपनीत अपघात; तरुण कामगाराचा मृत्यू

पिंपरी, ता. २ जुलै २०२६ - भोसरी एमआयडीसी परिसरातील मोशी येथील गोडाऊन चौकाजवळ असलेल्या ए/१ स्टॅम्पिंग कंपनीत झालेल्या गंभीर औद्योगिक अपघातात एका तरुण कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक १ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता घडली. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी बुंदेला रामधुजनिशाद (वय २३, रा. धावडेवस्ती, भोसरी; मूळ रा. उत्तर प्रदेश) यांचा भाऊ कंपनीत हेल्पर म्हणून कार्यरत होता. त्याला मशीनसंदर्भात कोणतेही तांत्रिक प्रशिक्षण नसतानाही प्रेस शॉप मशीनवर ऑपरेटर म्हणून काम करण्यास लावण्यात आले होते, असे फिर्यादीत नमूद आहे.

काम सुरू असताना मशीनमधून लोखंडी जॉब अचानक बाहेर उडून संबंधित कामगाराच्या गळ्याला लागल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी संदेश प्रभुराव पांडे, सुपरवायझर बाळाजी पंढरीनाथ आलुरे आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर दीपक शिवाजी राळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 आळंदीत ३३७ ग्रॅम गांजासह दोघांना अटक, ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी, ता. २ जुलै २०२६ - आळंदी नगरपरिषदेच्या पार्किंग परिसरात गांजा विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १६,८५०/- रुपयांचा ३३७ ग्रॅम गांजा व दुचाकीसह एकूण ७६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट-३, पिंपरी-चिंचवड येथील पोलिस शिपाई निखील माणिक फापाळे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींविरुद्ध आळंदी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जून रोजी सायंकाळी सुमारे ७.५५ वाजण्याच्या सुमारास आळंदी नगरपरिषदेच्या पार्किंगमध्ये ही कारवाई करण्यात आली. आरोपी विनयदीप गंगाधर मानवते (वय २९, सध्या रा. आंबेडकरनगर, चिंबळी, ता. खेड; मूळ रा. आरळ, ता. वसमत, जि. हिंगोली) आणि ईस्माईल मकबूल पठाण (वय २५, सध्या रा. बापदेव मंदिराजवळ, गायकवाड वस्ती, करळी, ता. खेड; मूळ रा. इंदिरानगर, सोलापूर) हे गांजा विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या ताब्यात बाळगत असल्याचे निदर्शनास आले.

त्यांच्याकडून १६ हजार ८५० रुपये किमतीचा ३३७ ग्रॅम गांजा तसेच ६० हजार रुपये किमतीची सुझुकी कंपनीची अॅक्सेस दुचाकी असा एकूण ७६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दक्षिण महाळुंगे पोलिस ठाण्याच्या हद्दीत २० वर्षीय युवकाकडून ५२ हजार रुपयांचा गांजा जप्त 

पिंपरी, ता. २ जुलै २०२६ - दक्षिण महाळुंगे पोलिसांनी खराबवाडी परिसरात कारवाई करून १ किलो ४७ ग्रॅम गांजा एका युवकाकडून जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत ५२ हजार ३५० रुपये आहे. 

या प्रकरणी पोलीस शिपाई शेखर रोहीदास खराडे (गुन्हे शाखा, युनिट-४, पिंपरी-चिंचवड) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जून रोजी रात्री सुमारे ८.५० वाजण्याच्या सुमारास दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खराबवाडी येथील ज्ञानवंदिनी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली. आरोपी पवनकुमार संजय साह (वय २०, सध्या रा. खराबवाडी, ता. खेड,  मूळ रा. बिहार) हा विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या गांजा बाळगत असल्याचे निदर्शनास आले. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळचा ५२,३५०/- किंमतीचा १ किलो ४७ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.

आरोपीविरुद्ध दक्षिण महांळुगे पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यातील कलम ८(क) व २०(ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories