नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, ता. २४ - राज्यातील सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीची अचूक आकडेवारी मिळविण्यासाठी आगामी कालावधीत कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन यांनी संयुक्तरित्या ड्रोनचे सर्वेक्षण करण्यासाठी कार्यवाही करावी. यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक माहिती मिळेल व पीक विमा कंपन्यांना भरपाई देताना कोणतीही अडचण येणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्ह्यातील केळीबाग नुकसानीसंदर्भात विधान भवनात आयोजित बैठकीत सांगितले.
राज्यातील केळी पिकांच्या नुकसानीबाबत विमा कंपन्यांनी स्थानिक प्रशासनाने केलेली नोंद तपासून घ्यावी. रियल टाइम डाटा, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटरचा डाटा आणि सॅटेलाइट डाटा तपासून घेऊन तत्काळ भरपाईची कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, रोहियो मंत्री भरत गोगावले, आमदार अमोल जावळे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार मंगेश चव्हाण, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सूरज मांढरे, जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे, यासह इतर विभागाचे अधिकारी तसेच विमा कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न होता झालेल्या नुकसानीनुसार मदत करावी. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन विमा कंपन्याना पैसे देत असते त्याची जाणीव ठेवून शेतकरी अडचणीत असताना कोणत्याही प्रकारची अडवणूक न करता नियमांप्रमाणे शेतकऱ्यांना मदत वितरित करावी.