देहू-आळंदी पंचक्रोशी परिसराला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी, वारकरी संप्रदायातील प्रमुख मंडळींची पत्रकार परिषद
देहू-आळंदी पंचक्रोशी परिसराला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी, वारकरी संप्रदायातील प्रमुख मंडळींची पत्रकार परिषद
पिंपरी, ता. २३ - संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी असलेल्या देहू आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचे संजीवन समाधी स्थळ असलेल्या आळंदी या दोन पवित्र तीर्थक्षेत्रांदरम्यानचा सुमारे १६ किलोमीटर परिसर राज्य शासनाने अधिकृतपणे ‘देहू-आळंदी पंचक्रोशी संतभूमी’म्हणून घोषित करावा, अशी मागणी आज अर्थतज्ज्ञ अभय टिळक यांच्यासह वारकरी संप्रदायातील प्रमुख मंडळींनी मंगळवारी (ता. २३) पत्रकार परिषदेत केली.
यावेळी, याबाबतचे निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले. वारकरी परंपरेतील अनेक संत, सिद्ध, नाथपंथीय साधक आणि संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना या परिसराशी निगडित असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. देहू, आळंदी, इंद्रायणी नदी परिसर, भंडारा डोंगर, इंदुरी, येलवाडी, चिखली यांसारख्या ठिकाणांचे धार्मिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.
उत्तराखंड सरकारने देवभूमीची संकल्पना स्वीकारल्याप्रमाणे महाराष्ट्रानेही देहू-आळंदी परिसराला संतभूमी म्हणून मान्यता द्यावी. याबाबत यापूर्वी मुख्यमंत्री यांच्याकडे अर्ज सादर करण्यात आला असून त्याचा सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही टिळक यांनी सांगितले. भाविकांच्या मते, या परिसराला संतभूमीचा दर्जा मिळाल्यास आध्यात्मिक वारसा जपण्यास चालना मिळेल, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन मिळेल तसेच आधुनिक विकास आणि संतपरंपरेची मूल्ये यांचा समतोल राखता येईल. भविष्यात या परिसरात सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कौशल्यविकास केंद्रांच्या माध्यमातून आदर्श सामाजिक विकासाचे मॉडेल उभे राहू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र शासनाने या मागणीची दखल घेऊन देहू-आळंदी पंचक्रोशी परिसराला संतभूमी म्हणून तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी करण्यात आली. जागृत संत तुकाराम महाराज संतपीठाचे संचालक ह.भ.प. राजू महाराज ढोरे आणि संचालिका डॉ. स्वाती संजय मुळे आदी यावेळी उपस्थित होते.